मुंबई : प्रतिनिधी/ NHI
मुंबई क्रिकेट असोसिएशन-एमसीए तर्फे महिला दिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर क्लब महिला क्रिकेट लीगमधील उद्घाटनीय सामन्यातच फोर्ट यंगस्टर्सच्या जान्हवी काटे (७० चेंडूत नाबाद १८५ धावा, ४ षटकार व ३५ चौकार) व रिया चौधरी (५३ चेंडूत नाबाद १११ धावा, १८ चौकार) यांनी धडाकेबाज नाबाद शतके ठोकली. जान्हवी व रियाची फटकेबाजी प्रतिस्पर्ध्यांच्या ९ गोलंदाजांऐवजी अखेर मर्यादित षटकांमुळे रोखली गेली. परिणामी जान्हवीला विक्रमी द्विशतक साकारता आले नाही. दोघींच्या ३१३ धावांच्या अभेद्य सलामी भागीदारीमुळे फोर्ट यंगस्टर्सने मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबचा २९४ धावांनी पराभव करून पहिला साखळी सामना धुमधडाक्यात जिंकला.
मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नाणेफेक जिंकून फोर्ट यंगस्टर्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. जान्हवी काटे व रिया चौधरी सलामी जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. दोघींनी नाबाद शतक ठोकून प्रतिस्पर्धी ९ गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यामुळे फोर्ट यंगस्टर्सने मर्यादित २० षटकात बिनबाद ३१३ धावांचा डोंगर उभारला. मांडवी क्लबला विजयी लक्ष्य पेलवले नाही. बटूल परेरा (१ धावात ३ बळी), हिमजा पाटील (६ धावांत ३ बळी), अंतरा तावडे (९ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मांडवी क्लबचा डाव १२.३ षटकात १९ धावसंख्येवर गडगडला. स्पर्धेचे शानदार उद्घाटन भारतीय क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांच्या हस्ते कर्नाटक खेळपट्टी-क्रॉस मैदान येथे झाले. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, सेक्रेटरी अजिंक्य नाईक, जॉईन्ट सेक्रेटरी दीपक पाटील, क्रिकेटपटू सरफराज खान, अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप, मंगेश साटम आदी उपस्थित होते.
*************contd…