छत्रपती शाहू महाराजांचे शहर असलेले कोल्हापूर हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी आदर्श ठिकाणः मोनीदीपा मुखर्जी, महासंचालक, माहिती व प्रसारण मंत्रालय
उद्घाटन प्रसंगी बचत गटातील महिलांसाठी माण देशी फाउंडेशन तर्फे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता विषयक कार्यशाळेचे आयोजन
मुंबई, 8 मार्च 2023 : ‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम परिक्षेत्राच्या महासंचालक मोनीदीपा मुखर्जी आणि नवी दिल्लीच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर महानगर पालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि माण देशी फाउंडेशनच्या कार्यक्रम संचालक अपर्णा सावंत देखील या सोहोळ्याला उपस्थित होत्या. महिला दिना निमित्ताने उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद समवेत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा संयुक्त पुढाकार आहे.
या प्रसंगी बोलताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम परिक्षेत्राच्या महासंचालक मोनीदिपा मुखर्जी म्हणाल्या, “छत्रपती शाहू महाराजांचे शहर असलेले कोल्हापूर हे या प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. सर्व कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला आणि स्टॉल्सना भेट द्यावी आणि या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध परस्परसंवादी कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे.” तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि या प्रदर्शनात विविध कार्यशाळा घेणाऱ्या अतिथी व्याख्यात्यांचे सहकार्यासाठी मुखर्जी यांनी आभार मानले.
माण देशी फाउंडेशनच्या कार्यक्रम संचालक अपर्णा सावंत यांनी उद्घाटन सत्रात, एक आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कार्यशाळा घेतली. माण देशी फाउंडेशन उपेक्षित महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करते. माणदेशी फाउंडेशनच्या कार्यशाळेत बचत आणि बँकिंग कार्यप्रणालीविषयी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण, उद्योजिकांच्या अनुभवाची देवाणघेवाण करण्याबरोबरच त्यांच्या ‘प्रदर्शन कम प्रशिक्षण’ बसला भेट देणे यांचा समावेश होता. माणदेशी फाऊंडेशनतर्फे उद्घाटन सोहळा आणि प्रशिक्षण सत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
उद्घाटनप्रसंगी शाहीर रंगराव पाटील यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकाशन विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तकप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
हे प्रदर्शन 8 ते 12 मार्च 2023 दरम्यान पाच दिवसांसाठी शालिनी पॅलेस समोरील रंकाळा तलाव उद्यान परिसरामध्ये सकाळी 11:00 ते रात्री 8:00 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. स्वातंत्र्यसैनिक,संशोधन, उद्योजिका अशा विविध क्षेत्रातील यशस्वी, कर्तृत्ववान भारतीय महिलांची माहिती प्रदर्शित करून लोकांना प्रेरणा देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. महिलांच्या कल्याणासाठीच्या सरकारी योजनांचीही माहिती देण्याचे काम प्रदर्शनातल्या विविध घटकांच्या मार्फत केले जात आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, डिजिटल क्विझ यांचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण मल्टीमीडिया घटकांनी समृद्ध आहे.
माणदेशी फाउंडेशनने आयोजित केलेल्या सत्राव्यतिरिक्त, मुंबईच्या पीआयबी म्हणजेच पत्र सूचना ब्युरोने या प्रदर्शनाबरोबरच महिलांना लाभदायक ठरतील अशा आणखी दोन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
यामध्ये ज्येष्ठ वकील, डॉ. संतोष शहा उद्या (9 मार्च) महिलांना कायदेशीर साक्षरता, विशेषत: वारसा आणि मालमत्ता कायद्याच्या मूलभूत गोष्टींवर, प्रशिक्षण सत्राला मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शनाच्या स्थानीच सकाळी 11:30 ते दुपारी 1:00 या वेळेत हे सत्र होईल.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी (11 मार्च) एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दृष्ट्या वंचित वर्गातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘उच्च शिक्षण: संधी, संस्था आणि सरकारी योजना’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत एकलव्य संघाच्या पूनम ढोबळे या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
महिला दिन उत्साहाने साजरा करताना केवळ आवश्यक असणारी माहितीच या प्रदर्शनातून दिली जात आहे असे नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यासाठी प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न आहे. सर्वांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन’ ने केले आहे.