नवी मुंबई/NHI
नवी मुंबई सानपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक ७९ व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ” होळी करा लहान पोळी करा दान ” हा उपक्रम राबविण्यात आला. त्यास रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.
होळीच्या दिवशी सानपाडा येथील सोसायट्यांमधून होळीच्या नैवेद्याच्या ११०० पोळ्या जमा करण्यात आल्या. तुर्भे व नेरूळ येथील गरीब वस्तीमधील गरजू लोकांना या पोळ्या देण्यात आल्या. सण साजरे करताना गरीब लोकांना आपल्या आनंदात सामावून घेऊया हा एक चांगला संदेश या उपक्रमामुळे दिला गेला.
प्रथेप्रमाणे आपण होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतो. प्रथेचा अवमान नाही परंतु ही पोळी (अन्न) होळी मध्ये राख होते.
आजची परिस्थिती पाहता समाजामध्ये भूकमारीने व कुपोषणामुळे अनेक बळी जात आहे. आजही एकवेळचे जेवण किती लोकांना मिळत नाही. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक ७९ च्या वतीने “होळी करा लहान, पोळी करा दान “अभियान राबविले.
शिवसेना शाखा क्रमांक ७९ कडून सानपाडा येथील गृहनिर्माण संस्थांना बॉक्स देण्यात आली होती. सोसायटीतील रहिवाश्यांनी या अभियानाला सहकार्य करून पुरण पोळी होळीमध्ये दहन न करता बॉक्समध्ये जमा केली. सोसायटीकडून आलेली पुरणपोळी (नैवैद्य) ज्यांना पैश्याअभावी सण साजरा करता आला नाही. त्यांना या पोळ्या दान करण्यात आल्या. या कार्यात अंनिस व हेलपिंग हँड या संस्थानी चांगली मदत केली. या कार्यात सहकार्य केल्याबद्दल सानपाडा येथील शाखा क्रमांक ७९ चे शाखाप्रमुख बाबाजी महादेव इंदोरे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश लाड, किरण वाळूज, सुयोग सुर्वे, मनीष कोठारी, अश्विन तुपे, रोहित चोरमुले ओम ढमाळ, अशोक तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले.