कल्याण टस्कर्सचा लागोपाठ दुसरा
मुंबई : सांघिक कामगिरी व अर्धशतकवीर सलमान अहमदचा अष्टपैलू खेळामुळे कल्याण टस्कर्सने कोपरखैरणे टायटन्सचा ८० धावांनी पराभव करून माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोपरखैरणे टायटन्सचा चौथ्या साखळी सामन्यातील हा तिसरा पराभव आहे. अष्टपैलू सलमान अहमदला सामनावीर पुरस्काराने क्रिकेटप्रेमी विनोद पवार यांनी गौरविले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिषेक घोष आदी उपस्थित होते.
कल्याण टस्कर्सने सलामीवीर जपजीत रंधवा (२७ चेंडूत ३५ धावा), अरमान शेख (१० चेंडूत २३ धावा), सलमान अहमद (३३ चेंडूत ५१ धावा), अष्टपैलू आदित्य धुमाळ (२० चेंडूत २५ धावा) आदी आघाडी फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे कोपरखैरणे संघाविरूध्द मर्यादित २० षटकात ६ बाद १८४ धावा फटकाविल्या. डावखुरे फिरकी गोलंदाज आदित्य धुमाळ (२७ धावांत ३ बळी) व यश सिंग (४ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे कोपरखैरणेचा डाव ८ बाद १०४ धावसंख्येवर संपला. परिणामी कल्याण टस्कर्सने ८० धावांच्या फरकाने शानदार दुसरा विजय नोंदविला आणि बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवले.
ठाणे टायगर्सचा सलग चौथा विजय
श्रीराज घरतची ३४ धावांची नाबाद फलंदाजी आणि जय धात्रक, सुमित मारकली यांचे प्रत्येकी ३ बळी, यामुळे ठाणे टायगर्सने सानपाडा स्कॉर्पियन्सचा ८ विकेटने लीलया पराभव करून माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग चौथा साखळी सामना जिंकला. साखळी गुणतालिकेत अपराजित ठाणे टायगर्सने ८ गुणांसह अव्वल आघाडी गाठली आहे. पहिल्या साखळी विजयासाठी सानपाडा स्कॉर्पियन्स अजूनही आतुर आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर ठाणे टायगर्सने नाणेफेक जिंकून सानपाडा संघाला प्रथम फलंदाजी दिली. ठाणे टायगर्सच्या जय धात्रक (१३ धावांत ३ बळी), सुमित मारकली (१४ धावांत ३ बळी), हेमंत बुचडे (१० धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे सानपाडाचा डाव १९.४ षटकात केवळ ८३ धावसंख्येवर गारद झाला. सलामीवीर साहिल गोडे (३३ धावांत २३ धावा) व श्रीराज घरत (३१ चेंडूत नाबाद ३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे ठाणे टायगर्सने १४ व्या षटकाला २ बाद ८४ अशी विजयी धावसंख्या सहज रचली. जय धात्रकला सामनावीर पुरस्काराने क्रिकेटप्रेमी डॉ. हुमायून जाफरी व प्रवीण घेवारी यांनी गौरविले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिषेक घोष, भूपेंद्र सिन्हा आदी उपस्थित होते.