रामचरित मानसनंतर आता बिहारमध्ये मनुस्मृतीवर गोंधळ सुरू झाला आहे. बिहारच्या शेखपुरा येथील प्रिया दास नामक तरुणीने मांस शिजणाऱ्या चुलीत मनुस्मृती जाळली. एवढेच नाही तर या जळत्या मनुस्मृतीने आपल्या हातातील सिगारेटही पेटवली. प्रिया दासच्या मनुस्मृती दहनाचा एक व्हिडिओ उजेडात आला असून, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
या व्हिडिओत दिसून येत आहे की, प्रिया मांस शिजवत आहे. प्रथम ती मनुस्मृती दाखवते. त्याच्या मुखपृष्ठावर ब्रह्माचा फोटो दिसत आहे. त्यानंतर ती म्हणते – हे एक वाईट पुस्तक आहे. त्यानंतर ती लाकडांसोबत मनुस्मृतीही चुलीत टाकते. त्यानंतर ती मध्येच जळती मनुस्मृती बाहेर काढून सिगारेट पेटवते.
शिक्षिका बनण्याची इच्छा, राजदची कार्यकर्ती
यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रिया दास या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या शिक्षिकेचे प्रशिक्षण घेत आहेत. राजकीयदृष्ट्याही त्या सक्रिय आहे. त्या RJD महिला सेलच्या सचिवही आहेत. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबतचे त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर दिसून येत आहेत.
पुस्तक जाळून मांस शिजवण्याचा उद्देश
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रिया दास स्वतः कॅमेऱ्यापुढे आल्या. त्या म्हणाल्या की, ही केवळ कृती आहे. कारण, त्याचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वी घातला आहे. मी मनुस्मृतीचे दहन करून दांभिकता व ढोंगीपणावर प्रहार केला आहे. ते अस्तित्वहीन बनवावे लागेल.
मनुस्मृतीबाबत प्रिया म्हणते की, हा एक वाईट ग्रंथ आहे. पुस्तकाचा उद्देश शिक्षण व ज्ञान देण्याचा असतो. पण हे पुस्तक मुलाच्या जन्मापूर्वीच त्याची जात व व्यवसाय ठरवते. या पुस्तकात जातीचे वर्णन देवासारखे करण्यात आले आहे. हे पुस्तक व्यक्तीला हीन भावनेने पाहते. ते समाजाला जोडणारे नव्हे तर तोडणारे पुस्तक आहे. ते समाजात दरी निर्माण करते. या ग्रंथात पुरुषाला देव व स्त्रीचा उल्लेख उपभोगाची वस्तू म्हणून करण्यात आला आहे.