प्रतिनिधी/NHI
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन-एमसीए तर्फे महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचे आयोजन ८ मार्चपासून होत आहे. महिला क्रिकेट लीगमध्ये ५२ क्लब सहभागी झाले असून ७८० महिला खेळाडूना स्पर्धेमधून क्रिकेटचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामधील उद्घाटनीय लढत ८ मार्च रोजी सकाळी ९.००वा. कर्नाटक खेळपट्टी-क्रॉस मैदान येथे बीसीसीआय सदस्या सुलक्षणा नाईक व मुंबईकर भारतीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा सामना महिला पंच व महिला गुणलेखक यांच्या नियंत्रणाखाली होईल.
एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये ५२ महिला संघ १३ गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. नवरोज क्रिकेट क्लब वि. पी.जे. हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फौंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब वि. स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब वि. माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे वि. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे. भाटीया स्पोर्ट्स क्लब आदी लढती बुधवारी मुंबईतील १३ क्रिकेट खेळपट्ट्यांवर रंगतील मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला व पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.