महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
सौजन्य- WPL २०२३ (ट्विटर)
MUMBAI : शनिवारी (दि. ४ मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतची शानदार तुफानी अर्धशतकी खेळी आणि त्याला गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे गुजरातचा अक्षरशः धुव्वा उडवला. हरमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत गुजरात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करत ऐतिहासिक धावसंख्या उभारली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने २०७ धावा चोपत गुजरातसमोर २०८ धावांचे भले मोठे आव्हान ठेवले होते. मात्र धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या पाच धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या त्यात हरलीन आणि गार्डनर यांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार बेथ मूनी तिसऱ्याच चेंडूवर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर पडली. दयालन हेमलता सोडल्यास कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. तिने २३ चेंडूत २९ धावा केल्या. ठराविक अंतरावर विकेट्स गमावल्याने अवघ्या ६४ धावांत गाशा गुंडाळला गेला.