भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कांगारू मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहेत. ४७ धावांची आघाडी घेतली असून भारताला लवकर विकेट्स घेण्याची आवश्यकता आहे.
India vs Australia 3rd Test: आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झाली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात कांगारू संघाने आतापर्यंत ४७ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात भारताने १०९ धावा केल्या त्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील खराब झाली. १२ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. डावाच्या दुसऱ्याच षटकात रवींद्र जडेजाने ट्रॅव्हिस हेडला (एलबीडब्ल्यू) पायचीत बाद केले. हेडला ६ चेंडूंत ९ धावा करता आल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेनला आज दोनवेळा जीवदान मिळाले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला होता मात्र तो नो बॉल निघाला त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर तो पायचीत होता मात्र रोहितने डीआरएस घेतला नाही त्यावेळी देखील तो बाद होता. शेवटी जडेजानेच त्याला ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा शानदार अर्धशतक झळकावत ६० धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ २६ धावा करून जडेजाचा शिकार झाला. सध्या पीटर हंड्स्कॉम्ब ७ तर कॅमरून ग्रीन ६ धावांवर खेळत आहेत. भारताकडून जडेजाने ४ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित १२ धावांवर यष्टिचित झाला. यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. गिल २१, पुजारा एक आणि कोहली २२ धावा करून बाद झाला. श्रेयसला खातेही उघडता आले नाही. भरतच्या १७ आणि अक्षरच्या १२ धावांनी भारताची स्थिती थोडी सुधारली. अश्विन तीन धावा करून बाद झाला आणि उमेशने १७ धावांची खेळी खेळून भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. सिराज खाते न उघडताच धावबाद झाला आणि भारताचा डाव १०९ धावांवर आटोपला.