NHI –
मुंबई, संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना चोरमंडळ या उल्लेखा नंतर शिवसेना शिंदे गट-भाजपाने आक्रमक भूमिका घेत राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या विधानाबाबत संजय राऊत यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच विरोधकांच्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीबाबतही त्यांनी भाष्य केलं.
“मी काय म्हणालो होतो, हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे”, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या हक्कभंगाच्या मागणीबाबतही प्रतिक्रिया दिली. “माझ्या विरोधात जर हक्कभंग आणण्यात आला, तर त्यावर चर्चा होईल, मी माझं म्हणणं तिथे मांडेन.मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही”, असे ते म्हणाले.
“माझी ही भूमिका त्यांच्या विरोधात होती, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादीत आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्या विषयी ते विधान केलं होते. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत”, असेही ते म्हणाले.
“यासंदर्भात माझी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी विधिमंडळाचा अपमान केला नाही. मला तो अपमान करायचाही नाही. मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या सहा महिन्यापासून हे सभागृह चोरमंडळाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे”, असा आरोपही त्यांनी केला.