mumbai : तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या प्रसाद पवारच्या चौकार-षटकारांसह धडाकेबाज अर्धशतकी फलंदाजीमुळे वाशी वॉरीअर्सने कल्याण टस्कर्सचा ६ गडी राखून पराभव केला आणि माझगाव क्रिकेट क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेच्या पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेची सलामी लढत जिंकली. सलामीवीर जपजीत रंधवाची आक्रमक अर्धशतकी खेळी अखेर कल्याण टस्कर्ससाठी निष्फळ ठरली. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर स्पर्धेचे शानदार उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, श्रीमती मीनल पालांडे, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी मान्यवर उपस्थित होते.
वाशी वॉरीअर्सविरुध्द नाणेफेक जिंकून कल्याण टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर जपजित रंधवाने (६३ चेंडूत ७३ धावा, ३ षटकार व ५ चौकार) एका बाजूने धडाकेबाज फलंदाजी केली. परंतु मध्यमगती गोलंदाज अतुल सिंग (४१ धावांत ३ बळी) व गोपेंद्र बोहरा (२५ धावांत २ बळी) यांनी नियंत्रित करणारी गोलंदाजी करून कल्याण टस्कर्सला मर्यादित २० षटकात९ बाद १४३ धावसंख्येवर रोखले. सलामीवर जयदीप परदेसी (४० चेंडूत ४० धावा, ४ चौकार) व प्रसाद पवार ( ३७ चेंडूत ७१ धावा, ४ षटकार व ६ चौकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करून वाशी वॉरीअर्सला विजयासमीप नेले. परिणामी १८ व्या षटकाला ४ बाद १४४ धावा फटकावीत वाशी वॉरीअर्स संघाने पहिल्या साखळी विजयावर शिक्कामोर्तब केला. मध्यमगती गोलंदाज जावेद खानने २३ धावांत २ बळी घेतले.