आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आयडियल ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल ‘सी’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरचे कल्पक नेतृत्व व सुथाकरण अब्राहमची दमदार फलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा ७ धावांनी पराभव केला. आक्रमक फलंदाजीसह अर्धशतकाकडे कूच करीत असतांना महेश सनगरला दुखापतीच्या कारणास्तव मैदान सोडावे लागल्यामुळे अखेर कस्तुरबा हॉस्पिटल संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कौंटी क्रिकेटपटू ओमकार मालडीकर, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे फायनान्स डायरेक्टर सतीश श्रॉफ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाइल खेळपट्टीवर कस्तुरबा हॉस्पिटलचे मध्यमगती गोलंदाज मंगेश आगे (२४ धावांत ३ बळी) व रोहन ख्रिस्तिअन (१९ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची भरवंशाची सलामी जोडी २२ धावसंख्येवर तंबूत परतली. तरीही सुथाकरण अब्राहम (४६ चेंडूत ४६ धावा, ५ चौकार) व सत्येंद्रकुमार (१४ चेंडूत नाबाद २५ धावा, ४ चौकार) यांनी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा डाव सावरून मर्यादित २० षटकात ८ बाद १३९ धावांचा टप्पा गाठला. महेश सनगर (३१ चेंडूत ४० धावा निवृत्त, १ षटकार व ४ चौकार) व रोहन ख्रिस्तिअन (२८ चेंडूत २५ धावा, २ चौकार) यांनी उत्तम फलंदाजी करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला २० षटकात ६ बाद १३२ धावांपर्यंतच मजल गाठता आली. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने ७ धावांच्या फरकाने चुरशीचा अंतिम विजय मिळविला. ओम्नी ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजन स्पर्धेमध्ये प्रदीप क्षीरसागरने सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा, रोहन महाडिक व संभाजी थोरात यांनी उत्कृष्ट फलंदाजीचा तर रोहन ख्रिस्तिअनने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला.