अखिल दाभोळखाडी भोई समाज-रत्नागिरी तर्फे १९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यात भोईराज चषक पुरुष व महिला कबड्डीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन पांढरदेवी कबड्डी संघ-अंजनवेल विरुद्ध फरारे कबड्डी संघ-फरारे यामधील लढतीने शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा समितीचे अध्यक्ष संजय पडवळ, कार्याध्यक्ष अरविंद सैतवडेकर, सचिव प्रवीण सैतवडेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे कबड्डी शौकिनांना दर्जेदार तीन सामने एकाचवेळी पाहण्यास मिळणार आहेत.
प्रतिष्ठेचा भोईराज चषक पटकाविण्यासाठी पुरुष गटात विविध गावातील नामवंत १६ संघ झुंजणार आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी अ गटात पांढरदेवी कबड्डी संघ-अंजनवेल, फरारे कबड्डी संघ-फरारे, वाघीवरे ग्रामविकास मंडळ-वाघीवरे, विठ्ठल रखुमाई कबड्डी संघ-वेलदूर, विसापूर कबड्डी संघ-विसापूर, महाकाळ पांगारी कबड्डी संघ-महाकाळ पांगारी, सातमाई देवी कबड्डी संघ-ओणनवसे तर ब गटात यंगस्टार कबड्डी संघ-केतकी, वेलकम कबड्डी संघ-पेवे, विठ्ठलवाडी नवजवान संघ-वि.वा.पांगारी, अमर कबड्डी संघ-दोणवली, ओम बजरंगबली कबड्डी संघ-गोवळकोट, कारूळ कबड्डी संघ-कारूळ आदी संघांमध्ये चुरस होईल. महिला गटामध्ये भोईराज चषकाच्या दावेदारीसाठी गांग्रई सातगाव विभाग महिला संघ-गांग्रई, गोवळकोट सातगाव महिला संघ-गावळकोट, कारूळ सातगाव विभाग महिला संघ-कारूळ, अंजनवेल सातगाव विभाग महिला संघ-अंजनवेल यामध्ये प्रमुख लढती होणार आहेत.