मुंबई, २७ जुलै : २०२१च्या अखेरीस उत्तम वेग धरल्यानंतर, हे वर्षही भरभराटीचे जाणार अशी चिन्हे आहेत, कारण जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती प्रतिकूल असूनही गृहग्राहकांमध्ये आशावाद कायम आहे. क्रेडाई-एमसीएचआय व ट्रुबोर्ड पार्टनर्स यांनी प्रसिद्ध केलेल्या हाउस पर्चेस सेंटीमेंट इंडेक्सनुसार (जून २०२२), *मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ४७ टक्के संभाव्य गृहग्राहक लवकरात लवकर घर खरेदी करण्याबाबत आशावादी आहेत, कारण कर्ज व अन्य वस्तूंच्या किंमती लवकरच वाढणार आहेत असा त्यांचा अंदाज आहे. हाउस पर्चेस सेंटिमेंट इंडेक्स अर्थात घर खरेदी भावना निर्देशांक, आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी घसरला आहे पण तरीही स्कोअर ६५.५ म्हणजेच, ५० या निराशावादाच्या सीमेहून बराच वर अर्थात आशावादी आहे. वाढत्या पॉलिसी दरांमुळे मागील तिमाहीच्या तुलनेत ग्राहक भावना निर्देशांक काहीसा कमी झाला असला तरी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३ पैकी २ ग्राहकांना किंमतींमध्ये वाढ होईल असे वाटत आहे आणि म्हणूनच पुढील ३-६ महिन्यांत घर खरेदी करायचे हे त्यांनी निश्चित केले आहे. अर्थात, या आशावादात तिमाहीगणिक घट होत असल्यामुळे, पुढील ६ महिने संभाव्यतेचे रूपांतर विक्रीत होत राहील, पण वाढती चलनवाढ व रेपो दरांमध्ये सातत्यपूर्ण वाढ यांमुळे आर्थिक वर्ष २०२२च्या दमदार दुसऱ्या सहामाहीतील कामगिरी ओलांडणे कदाचित शक्य होणार नाही.
अपेक्षित दरवाढ व वाढीव तारण दरांसारखे निर्बंध येऊनही, अर्थव्यवस्थेतील सुधारणा व भविष्यकाळात अधिक चांगल्या उत्पन्नाची संभाव्यता यांमुळे गृहग्राहकांमधील आशावाद कायम आहे. एमएमआरमधील विविध भागांमधील मते वेगवेगळी आहेत असे निर्देशांकावरून दिसते. पूर्व उपनगरांमधील ग्राहक हे येत्या ३-६ महिन्यांत घर खरेदी करण्याबाबत बहुतांशी आशावादी आहेत, तर दक्षिण मुंबईतील ग्राहकांचा पवित्रा काहीसा सावध आहे.
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष श्री. बोमन इरानी म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीतही उद्योगक्षेत्रात किती स्थितीस्थापकत्व आहे यावर हाउस पर्चेस सेंटिमेंट इंडेक्समधून प्रकाश टाकला गेला आहे. जागतिक स्तरावर अनिश्चितता असूनही, भारतातील रिअल इस्टेट गुंतवणूक सुरक्षित राखण्याचा प्रमुख मार्ग आहे. कारण, एमएमआरमधील गृहग्राहकांच्या मते गृहकर्जांचे दर वाढणार आहेत, पण रिअल इस्टेट उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळत असलेल्या स्थिरतेवर त्यांचा भरवसा आहे. शेअर बाजारांमध्ये अलीकडेच झालेल्या चढउतारांमुळे, रिअल इस्टेटसारख्या स्थावर मालमत्तांच्या किंमती अधिक स्थिर झाल्या आहेत आणि पर्यायाने पगारदार व्यक्ती घरामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता अधिक आहे. सध्या उर्वरित एमएमआरच्या तुलनेत ठाण्यातील ग्राहक घरखरेदीच्या योजनांबाबत अधिक लवचिक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राला सहाय्य करणाऱ्या अधिक चांगल्या व बदलत्या काळाशी सुसंगत पद्धती राबवण्यासाठी क्रेडाइ-एमसीएचआय सातत्याने सरकारसोबत काम करत आहे.”
ट्रुबोर्ड पार्टनर्सच्या रिअल इस्टेट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संग्राम बावीस्कर, भारतातील कॉर्पोरेट व रिटेल कर्जवितरण तसेच गुंतवणूक परिसंस्थेतील संबंधितांना सहाय्य करण्याबाबत म्हणाले, “या अहवालात संभाव्य गृहग्राहकांच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडील काळात किंमतींमध्ये झालेली वाढ, रेपो रेट व कर्जदरांमध्ये झालेली वाढ बघता हा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. ४० ते ५० वर्षे वयोगटातील दर ४ पैकी एका ग्राहकाच्या मते, पुढील ६ महिन्यांत घरांच्या किंमती व व्याजदर वाढणार आहेत आणि म्हणून पुढील काही महिने गृहग्राहकांसाठी चांगली संधी आहे असे गृहीत धरून ते घर खरेदीची योजना आखत आहेत. भविष्यकाळात कितीही आव्हाने असली, तरी एमएमआर सातत्याने वाढत राहणार आहे.
कमी जोखमीत खरेदी करणारे ग्राहक (वाढत्या किंमती व व्याजदरांचा अंदाज असलेले पण तरीही घर खरेदीच्या योजना आखणारे) बीकेसी, चेंबूर, लोअर परेल व पवई आदी भागांमध्ये खरेदीचे व्यवहार करतील अशा संभाव्यतेचा संकेत या अहवालाने दिला आहे. या एमएमआरमधील उगवत्या सूक्ष्म बाजारपेठा आहेत. चेंबूरमध्ये ४८ टक्के संभाव्य ग्राहक हे कमी जोखीम पत्करणारे ग्राहक आहेत, तर बीकेसीमध्ये हे प्रमाण ३२ टक्के आहे. एमएमआरमधील अन्य भागांच्या तुलनेत ठाणे व पूर्व उपनगरातील व्यावसायिक वर्ग या दिशेने अधिक प्रमाणात जाईल असा अंदाज क्रेडाई-एमसीएचआयने, उद्योगक्षेत्राचा कल व या अहवालातील ठळक मुद्दे यांच्या आधारे, बांधला आहे. पगारदार ग्राहक व्यवसाय मालकांहून अधिक आशावादी असले, तरी व्यावसायिकही परिस्थितीची चाचपणी करताना दिसत आहेत.