कणकवलीत आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
सिंधुदुर्ग : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कणकवली इथे, “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची वृद्धी आणि विकासासाठी वाव” या विषयावर चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एमएसएमई विभागाचे सचिव, बी. बी. स्वैन, कॉयर (काथा) बोर्डाचे अध्यक्ष श्री.डी.कुप्पुरमु, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, नारायण राणे यांनी युवकांना उद्योगक्षेत्रात येण्याचे आवाहन केले. ‘युवकांनी नोकऱ्या मागणारे राहण्याऐवजी नोकऱ्या देणारे व्हावे’ असे राणे म्हणाले. सर्व हितसंबंधीयांच्या सक्रिय सहकार्याने, एमएसएमई क्षेत्र, गतिमान आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनू शकते, असेही ते पुढे म्हणाले. एमएसएमई क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून, एमएसएमई क्षेत्रातील योजनांविषयी जनजागृती होईल आणि त्यातून युवकांना, स्वयंरोजगरांची प्रेरणा मिळेल, परिणामी ‘आत्मनिर्भर भारताच्या’ उभारणीला बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राणे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन, विविध उद्योग प्रदर्शकांशी संवाद साधला. या प्रदर्शनात, वस्त्रोद्योग, हर्बल उत्पादने, चामडयाच्या वस्तू, आणि नारळाच्या काथ्याची उत्पादने अशा अनेक लघुउद्योजकांनी आपले स्टॉल्स लावले आहेत. या कार्यक्रमादरम्यान, उद्यम असिस्ट पोर्टल अंतर्गत सहाय्यित असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म उपक्रमांना, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्रा(NSSH) अंतर्गत अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.सिंधुदुर्ग इथे नव्याने स्थापन झालेली खादी उद्योग संस्था, जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्थेला यावेळी चरखा आणि मागाचे वाटप करण्यात आले. अतिरिक्त विकास आयुक्त, डॉ इशिता गांगुली त्रिपाठी आणि संयुक्त सचिव मर्सी यांनी यावेळी एमएसएमई योजनांचे सादरीकरण केले.
विक्रेता विकास कार्यक्रमादरम्यान, माझगाव डॉकयार्ड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, अणुऊर्जा विभाग, कोकण रेल्वे, गोवा शिपयार्ड, जीईएम, कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) यासारख्या विविध सार्वजनिक उपक्रम आणि संस्था यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.