सावंतानी जो व्हिडिओ समोर आणला आहे, त्यात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, यांच्यासह दिग्गज नेते समोर बसलेले दिसून येत आहे. 2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती. तर दुसरीकडे 9 नेते आणि 21 उपनेते यांची निवड बिनविरोध पार पडली होती. यात नेते पदासाठी 9 आणि उपनेते पदासाठी 9 आणि 21 अर्ज आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी सांगतानाचा व्हिडिओ समोर आणला आहे. व्हिडिओमध्ये विविध पदांच्या घोषणाही करण्यात आल्याचे दिसत असून यामध्ये लीलाधर डाके, गजानन किर्तीकर, दिवाकर रावते, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये तर शिंदेसोबत असलेल्या अनेक नेत्यांनी ठाकरे कुटुंबियांचे कौतुक केल्याचे दिसून येते. तर खुद्द रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना शिवसेना नेते पदाचा प्रस्ताव मान्य असल्याचे जाहीर केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर गजानन किर्तीकर यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिल्याचंही यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकारिणी निवडीचे पत्र 4 एप्रिल 2018ला निवडणूक आयोगाकडे सादर केले पण आयोगाने धादांत खोट सांगितले की ते आम्ही दिलेच नाही.देशाचा सध्या अमृतकाल सुरू आहे की विषकाल हे आता ठरवावे लागेल, देशाच्या सर्वोच्च घटनेलाच निवडणूक आयोगाने घाव घातला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.