निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेतला.
उद्धव ठाकरेंना आज बाळासाहेबांप्रमाणेच भर रस्त्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी कारमध्ये उभे राहून त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं. “ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत,” असेही ते म्हणाले. “मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ज्यांनी धनुष्यबाण चोरला आहे त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे. अद्याप त्यांना मधमाशांचे डंख लागले नाहीत. आता हे डंख मारण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली.
धनुष्यबाण कोणाचा हे जनतेला ठरवू द्या. शिवसेना कोणाची हे कोणालाही विचारा. यांचा एक डाव सुरू आहे. त्यांना ठाकरे नाव हवं आहे, बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. मात्र, शिवसेनेचं कुटुंब नको आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपालाही लक्ष्य केलं. आमच्यावर मोदींचं नाव सांगून आरोप करत होते. तेव्हा आमची युती होती. तेव्हा लोक मोदींचा मुखवटा घालून सभेला यायचे, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही. मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे जनतेला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. निवडणूक आयोगाने काल गुलामी केली. निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. कारण आत्ताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. असे गुलाम त्यांनी अवतीभोवती ठेवले आहेत. मी या गुलामांना आव्हान देतो की, शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
“असा आघात मागील ७५ वर्षांत कोणत्याही पक्षावर झाला नसेल. भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आमच्या अंगावर सोडून आम्हाला संपवता येईल, तर शिवसेना संपवणं शक्य नाही. त्यांच्या पुढील अनेक पीढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.