प्रकाश पुराणिक स्मृती चषक क्रिकेट
राजावाडीसह फोर्ट यंगस्टर्स, स्पोर्टस्फिल्ड, पय्याडे उपांत्य फेरीत
मुंबई, दि. १६ (क्री.प्र.)- रिद्धी ठक्करच्या प्रभावी फिरकीपुढे ग्लोरियस क्रिकेट क्लबचा अवघा संघ ७० धावांत गारद झाला आणि पय्याडे स्पोर्टस् क्लबने विजयी लक्ष्य २ फलंदाजांच्या मोबदल्यात ६.४ षटकांतच गाठले आणि माहीम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लबच्या प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच राजावाडी, फोर्ट यंगस्टर्स आणि स्पोर्टस्फिल्ड यांनी अंतिम चार संघांत स्थान मिळविले. आता शुक्रवारी उपांत्य फेरीत पय्याडे विरुद्ध स्पोर्टस्फिल्ड तर फोर्ट यंगस्टर विरुद्ध राजावाडी अशा लढती रंगतील.
शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पय्याडेच्या रिद्धी ठक्करच्या फिरकीसमोर ग्लोरियसचा डाव रंगूच शकला नाही. रिद्धीने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून ग्लोरियसचे कंबरडे मोडले. परिणामता त्यांचा डाव ७० धावांतच आटोपला. पय्याडेच्या खुशी भाटिया (२२) आणि सलोनी कुष्टे (ना. ३६) यांनी ६४ धावांची घणाघाती सलामी देत मोठ्या थाटात उपांत्य फेरी गाठली. रिद्धी पय्याडेच्या विजयाची शिल्पकार ठरली.
दुसर्या उपांत्यपूर्व लढतीत राजावाडी क्रिकेट क्लबने वृषाली भगतच्या ३७ चेंडूतील ६२ धावांच्या जोरावर ६ बाद १३४ अशी दमदार मजल मारली. प्रत्युत्तरादाखल गौड युनियन स्पोर्टस् क्लबचा संघ २० षटकांत ७ बाद ८४ धावांपर्यंतच पोहचू शकला. राजावाडीच्या सेजल राऊतने ७ धावांत ३ विकेट मिळविल्या. गौड युनियनकडून चेतना बिश्तने आणि निर्मिती राणे या दोघींनी प्रत्येकी २७ धावा केल्या. या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा मान वृषाली भगतला मिळाला.
अन्य उपांत्यपूर्व लढतीत फोर्ट यंगस्टर्स , विरारने पालघर-डहाणू तालुका स्पोर्टस असोसिएशनचा ७ विकेटनी पराभव केला. पालघर-डहाणू संघाने ८ बाद ९८ धावा केल्या तर फोर्ट यंगस्टर्सने मानसी पाटील (२६) आणि झिल डिमेलो (३९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर २० चेंडू आणि ७ विकेटनी विजय नोंदविला. तसेच स्पोर्टस् फिल्डने दहिसर स्पोर्टस् क्लबचा ३९ धावानी पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
संक्षिप्त धावफलक-
ग्लोरियस सीसी : १८.३ षटकांत सर्वबाद ७० ( इरा जाधव १०, जया नेगी १०; रिद्धी ठक्कर ४-०-१२-३, श्रद्धा सिंग ४-०-१०-२, रिद्धी कोटेचा २-०-११-२) पराभूत वि. पय्याडे एससी : ६.४ षटकांत २ बाद ७१ (खुशी भाटिया २२, सलोनी कुष्टे ३६ ; सिद्धी पवार १-०-२३-१)
राजावाडी सीसी : २० षटकांत ६ बाद १३४ (वृषाली भगत ना. ६२, सायली सातघरे १२, धनश्री वाघमारे २५, निविया आंब्रे १३; अक्षी गुरव ४-०-२४-२) वि. वि. गौड युनियन सीसी : २० षटकांत ७ बाद ८४ ( तनिषा गायकवाड १३, चेतना बिश्त २७, निर्मिती राणे २७ ; सेजल राऊत ४-०-७-३, वृषाली भगत १-०-१३-१)
पालघर-डहाणू तालुका एसए : २० षटकांत ८ बाद ९८ ( ययाती गावड २३, अश्विनी निशाद २७ ; बातुल परेरा ४-०-१४-२, झिल डिमेलो ३-०-१५-१) पराभूत वि. फोर्ट यंगस्टर्स (विरार) : १६.४ षटकांत ३ बाद ९९ ( मानसी पाटील २६, झिल डिमेलो ३९ ; ययाती गावड ४-०-२७-२, शुभ्रा राऊत ३-१-१५-१)
स्पोर्टस् फिल्ड सीसी : २० षटकांत ५ बाद १२९ ( शाहीन अब्दुल्ला २२, फातिमा जाफर २९, श्वेता कलपती २५ ; प्रिया मिसाळ ४-०-२१-२, सौम्या सिंग ३-०-१६-१) विजयी वि. दहिसर स्पोर्टस् क्लब : १९.१ षटकांत सर्वबाद ९० (निधी घरत ३२ ; पालक धरमशी ३.१-०-२४-१, फातिमा जाफर ३-०-८-२)
पय्याडे स्पोर्टस् क्लबच्या विजयात मोलाची कामगिरी करणार्या रिद्धी ठक्करला विजयाचे शिल्पकार म्हणून पुरस्कार देताना ज्येष्ठ क्रिकेटपटू विजू ठाकूर आणि ज्येष्ठ क्रिकेट पंच सुरेंद्र बाबरेकर