मुंबई : बॉम्बे जिमखाना लिमिटेड आयोजित निर्लॉन-आरएफएस तल्यारखान स्मृती क्रिकेट स्पर्धेत पी. जे. हिंदू जिमखानाने अखेर जेतेपदावर नाव कोरले. बॉम्बे जिमखाना मैदानावर प्रकाशझोतात झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी पारसी जिमखाना संघावर 43 धावांनी मात केली.मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज विनायक भोईर (26 चेंडूंत 52 धावा, 4 चौकार, 2 षटकार) आणि प्रसाद पवार यांच्या (26चेंडूंत 49 धावा, 6 चौकार, 1 षटकार) फटकेबाजीसह ऑफस्पिनर सिद्धेश लाडची (4-30) प्रभावी गोलंदाजी हे हिंदू जिमखान्याच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
पी. जे. हिंदू जिमखान्याचा संघ तब्बल 18 वर्षांनंतर विजेता बनला आहे. यापूर्वी, 2005मध्ये एमसीए कोल्ट्सचा पराभव करताना त्यांनी जेतेपद पटकावले होते.
पारसी जिमखाना संघाला सलग दुसर्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पोलीस ढाल आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत एमआयजी क्रिकेट क्लबकडून त्यांचा पराभव झाला होता.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पी. जे. हिंदू जिमखाना संघाला पहिल्याच षटकात फॉर्मात असलेल्या ब्रविश शेट्टीला गमवावे लागले. मात्र सलामीवीर हर्ष साळुंखेने 30 धावाआणि सिद्धेश लाडने 25 धावा करताना विनायक भोईर व प्रसाद पवार यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे पी. जे. हिंदू जिमखान्याने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 194 धावा केल्या. पारसी जिमखान्याकडून आतिफ अत्तरवालाने 51 धावांत 3 विकेट घेतल्या.
फलंदाजीनंतर हिंदू जिमखान्याने चांगली गोलंदाजीही केली. त्यात सिद्धेश लाड (३० धावात ४ बळी) सर्वात प्रभावी ठरला.डावखुरा फिरकीपटू भोईरची (29 धावांत 2 विकेट) त्याला चांगली साथ लाभली. त्यांनी पारसी जिमखान्याला 20 षटकांत 9 बाद 151 धावांवर रोखले. नूतन गोयल 24 धावा, आदित्य तारे 21 धावा आणि आकर्षित गोमेल 20 धावा केल्या तरी त्यांना मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यामुळे पारसी जिमखान्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.