मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व शिवाजी पार्क जिमखाना-एसपीजी आयोजित क्रिकेटपटू स्व.प्रकाश पुराणिक स्मृती चषक माहीम ज्युवेनाईल टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी १८ फेब्रुवारी रोजी एसपीजी खेळपट्टीवर होणार आहे. विजेतेपदासाठी उपांत्य फेरीत धडक देणारे पय्याडे स्पोर्ट्स क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब, फोर्ट यंगस्टर्स, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब यामध्ये चुरस राहील. विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्काराने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे व भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार असल्याची माहिती माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस सुनील पाटील यांनी दिली.
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पय्याडे स्पोर्ट्स क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबला ८ विकेटने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करतांना ग्लोरियस क्रिकेट क्लबचा डाव १८.३ षटकात अवघ्या ७० धावसंख्येवर रिध्दी ठक्कर (१२ धावांत ३ बळी), श्रध्दा सिंग (१० धावांत २ बळी), रिध्दी कोटे (११ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे गारद झाला. विजयी लक्ष्य आटोक्यात राहिल्यामुळे सलोनी कुष्टे (३६ धावा) व ख़ुशी भाटीया (२२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि पय्याडे स्पोर्ट्स क्लबला ६.४ षटकात २ बाद ७१ अशी विजयी धावसंख्या रचून दिली.दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अर्धशतक झळकविणारी वृषाली भगतच्या (नाबाद ६२ धावा) दमदार फलंदाजीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १३४ धावा फटकाविल्या. सेजल राऊतची (७ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजी व उत्तम क्षेत्ररक्षणाच्या बळावर राजावाडी क्रिकेट क्लबने गौड युनियन क्रिकेट क्लबचा डाव २० षटकात ७ बाद ८४ धावसंख्येवर संपुष्टात आणला आणि ५० धावांनी मोठा विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली.
तिसऱ्या सामन्यात फोर्ट यंगस्टर्सने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशची ९८ धावसंख्या ३ विकेटच्या मोबदल्यात गाठली. ७ विकेटने शानदार विजय मिळविताना फोर्ट यंगस्टर्सच्या मानसी पाटील (२६ धावा) व झिल डिमेलो (३९ धावा) फलंदाजीत चमकल्या. शेवटच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करतांना उभारलेले ५ बाद १२९ धावांचे आव्हान दहिसर स्पोर्ट्स क्लबला पेलवले नाही. दहिसर स्पोर्ट्स क्लबचा डाव ९० धावांवर कोसळला आणि स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने ३९ धावांनी विजय मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.