मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखानातर्फे क्रिकेटपटू स्व.प्रकाश पुराणिक स्मृती चषक माहीम ज्युवेनाईल टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्लोरियस क्रिकेट क्लब, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने सलामीचे सामने जिंकले. श्रध्दा शेट्टी व साध्वी संजय यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ग्लोरियस क्लबने पार्कोफेने क्रिकेटर्सचा ८३ धावांनी तर अचल वळंजूच्या दमदार फलंदाजीमुळे स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने कामत मेमोरियलचा ९ विकेटनी पराभव करून दुसरी फेरी गाठली. शिवाजी पार्क मैदानातील एमजेएससी खेळपट्टीवर स्पर्धेचे शानदार उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एमसीएचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक, दिपक पाटील, विजय येवलेकर, संजीव खानोलकर, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्कोफेने क्रिकेटर्सने नाणेफेक जिंकून ग्लोरियस क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. साध्वी संजय ( ४१ चेंडूत ३८ धावा, ५ चौकार) व हर्षिता सेनी (२३ चेंडूत २३ धावा, ३ चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून ग्लोरियस क्लबला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या श्रध्दा शेट्टीने (३५ चेंडूत नाबाद ४५ धावा, ४ चौकार) आक्रमक फलंदाजी करीत ग्लोरियस क्लबला मर्यादित २० षटकात २ बाद १५२ धावांचा टप्पा गाठून दिला. विजयी धावांचा पाठलाग करतांना पार्कोफेने क्रिकेटर्सची प्रारंभापासून रिया साळुंखे (७ धावांत ३ बळी), जान्हवी निगडे (१४ धावांत २ बळी), जया नेगी (१५ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे घसरगुंडी झाली. आकांक्षा पिल्लईने (३४ चेंडूत नाबाद २४ धावा, ३ चौकार) डाव सावरण्याचा प्रयत्न करूनही पार्कोफेने क्रिकेटर्सचा डाव २० व्या षटकाला ९ बाद ६९ धावसंख्येवर संपुष्टात आला आणि ग्लोरियस क्लबने ८३ धावांनी विजय मिळवित पहिली फेरी जिंकली. दुसऱ्या सामन्यात स्पोर्ट्स फिल्ड क्लबची फिरकी गोलंदाज फातिमा जाफर (५ धावांत २ बळी), ऑफ ब्रेक गोलंदाज अमृता परब (९ धावांत १ बळी) व पलक धरमशी (११ धावांत १ बळी) यांच्या प्रभावी कामगिरीमुळे कामत मेमोरियल संघाला २० षटकात ७ बाद ६८ धावांच करता आल्या. स्पोर्ट्स फिल्ड क्लबने विजयी १ बाद ६९ धावा फटकविताना सलामीची फलंदाज अचल वळंजू (३१ चेंडूत नाबाद ४० धावा, ८ चौकार) चमकली.