PAK W vs IND W T20 World Cup Cricket match : पाकिस्तान क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू मजा-मस्करी करताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ग्रुप फोटो काढले आणि ऑटोग्राफ केलेल्या टी-शर्टची देवाणघेवाणही केली.
टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. भारतीय संघाने रविवारी (१२ फेब्रुवारी) महिला टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. हा सामना भारताने ७ विकेट्सनी जिंकला.
जेमिमा रॉड्रिग्जच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने १५० धावांचे लक्ष्य १९ व्या षटकात गाठले. या जबरदस्त सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू मजा-मस्करी करताना दिसत आहेत.
या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. व्हिडिओमध्ये भारत-पाकिस्तानचे खेळाडू मॅचबद्दल बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, स्टार खेळाडू शेफाली वर्मा आणि इतर सर्व खेळाडू व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ग्रुप फोटो काढले आणि ऑटोग्राफ केलेल्या टी-शर्टची देवाणघेवाणही केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फार कमी सामने खेळले जातात. पण या सामन्यानंतर अशा दृश्यांनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
Players’ interactions after the #INDvPAK match at Newlands 🇵🇰🇮🇳#BackOurGirls | #T20WorldCup pic.twitter.com/Yc4YcKxV2v
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 13, 2023
📸 A #SpiritOfCricket moment following the #T20WorldCup clash 🤝#BackOurGirls | #INDvPAK pic.twitter.com/jcI8OI2Cwg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 13, 2023
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या, पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारूफने ६८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
एकावेळी तीन विकेट्स गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता, मात्र जेमिमा आणि रिचा यांनी शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. रिचा आणि जेमिमा यांनी ५८ धावांची नाबाद भागीदारी केली. जेमिमाने ३८ चेंडूंत ८ चौकारांसह ५३ धावा केल्या. त्याचवेळी ऋचा घोषने २० चेंडूत ५ चौकार मारले. रिचाने ३१ धावा केल्या. जेमिमाला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
भारतीय संघाला आता पुढील सामना १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचा आहे. ग्रुप-बीमध्ये या विजयासह टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी १५ फेब्रुवारीला पाकिस्तानचा संघ आयर्लंडला भिडणार आहे.