‘नय्यो लगदा’मध्ये दिसला सलमान खान आणि पूजा हेगडेचा रोमँटिक अंदाज
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. बिग बॉस 16च्या ग्रँड फिनालेमध्ये हे रोमँटिक साँग रिलीज करण्यात आले आहे. ‘नय्यो लगदा’ असे या गाण्याचे बोल आहेत.हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले असून याचे बोल शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच, पलक मुच्छलने हे गाणे गायले आहे. या गाण्यात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसतेय. गाण्यातील दोघांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय.
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. फरहाद सामजी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सचा तडका असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.