केंद्र सुप्रीम कोर्टाला म्हणाले – तज्ज्ञांची नावे सोपवू; अदानी वादात भासली गरज
सुप्रीम कोर्ट अदानी समूहाशी संबंधित हिंडेनबर्ग रिपोर्टविरोधात दाखल करण्यात आलेल्या 2 जनहित याचिकांवर सुनावणी करत आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी झाली होती. त्यात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी एस नरसिंह व न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) भविष्यात गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कोणते उपाय करता येतील यावर शिफारशी मागवल्या होत्या. सेबीतर्फे युक्तिवाद करणारे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांना कोर्टाने या प्रकरणी सोमवारी पूर्ण तयारीनिशी येण्याचे निर्देश दिले होते.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे गुंतवणूकदारांना नुकसान
वकील एम एल शर्मा व विशाल तिवारी यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांत हिंडेनबर्गने शेअर्स शॉर्ट सेल केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
तिवारी यांच्या मते, हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे देशाची प्रतिमा मलीन झाली. याचा अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. तर शर्मा यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, रिपोर्टवरील माध्यमांच्या वृत्तांचा बाजाराला फटका बसला. विशेषतः हिंडेनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनाही आपल्या दाव्यांखातर भारतीय नियामक सेबीकडे पुरावे सादर करण्यात अपयश आले आहे.

याचिकांत FIR दाखल करण्याची व तपास करण्याची मागणी
- मनोहर लाल शर्मा यांनी याचिकेत SEBI व केंद्रीय गृह मंत्रालयाला हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन व भारतातील त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- विशाल तिवारी यांनी SCच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करून हिंडेनबर्ग रिपोर्टची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिवारी यांनी शेअर कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांवर पडणाऱ्या विपरित परिणामांचीही चर्चा केली आहे.
हिंडेनबर्गने शेअर मॅन्युप्युलेशनचे आरोप केले
24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रकाशित केला. त्यात अदानीवर मनी लाँड्रिंगपासून शेअर्समध्ये फेरफार करण्यापर्यंतचे विविध आरोप गकरण्यात आले होते. या अहवालानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 1000 रुपयांपर्यंत घसरला होता. पण नंतर तो सावरला.

अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी घसरण दिसून आली. समूहाची फ्लॅगशिप कंपनी असणाऱ्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 7.63% घसरण झाली. याशिवाय ट्रान्समिशन, पोर्ट्स, विल्मर, पॉवर, टोटल गॅस, ग्रीन एनर्जी, अंबुजा सीमेंट व एनडीटीव्हीमध्येही 5 टक्क्यांच्या आसपास घसरण झाली. एसीसीच्या शेअर्समध्येही 3% हून जास्त घसरण नोंदवण्यात आली.
श्रीमंतांच्या यादीत 23 व्या क्रमांकावर
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे सोमवारी गौतम अदानी यांचे नेटवर्थ घसरून 4.49 लाख कोटी रुपयांवर (54.4 अब्ज डॉलर्स) आले आहे. तत्पूर्वी एक दिवसापूर्वी ते 4.78 लाख कोटी रुपयांवर (58अब्ज डॉलर्स) होते. या घसरणीमुळे ते फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर लिस्टमध्ये 23 व्या क्रमांकावर फेकले गेलेत. आज त्यांच्या नेटवर्थमध्ये 29.77 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट निम्म्यावर
अदानी समूहाने आपले महसूल वाढीचे लक्ष्य निम्मे केले आहे. ब्लूमबर्गने या प्रकरणाशी परिचित लोकांचा दाखला देत म्हटले आहे की, अदानी समूहाने पुढील आर्थिक वर्षासाठी आपले रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट निम्म्याने कमी केले आहे. प्रथम या ग्रुपने हे टार्गेट 40 टक्के ठेवले होते. त्यानंतर आता त्यांनी ते 15 ते 20 टक्के ठेवले आहे. गौतम अदानींच्या लिस्टेड कंपन्यांना हिंडेनबर्गचा अहवाल जारी झाल्यापासून 100 अब्ज डॉलर्सहून अधिकचे नुकसान झाले आहे.