महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने १४९ धावांचा डोंगर उभारूनही भारताने हे आव्हान लिलया पेलले आहे. भारताने सात गडी राखून हा सामना खिशात घातला आहे. या विजयासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत एक खास विक्रम केला आहे.
भरातीय महिला संघाने रचला इतिहास
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या भारताने सात गडी राखून गाठली. सुरुवातीला १५० धावांचे हे लक्ष्य अशक्य वाटत होते. मात्र भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्जने (५३, नाबाद) आक्रकपणे फलंदाजी केल्यामुळे भारताला हे लक्ष्य गाठणे शक्य झाले. या विजयासाठी भारताने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे.
सचिन तेंडुलकर, विराट कोहलीने केले अभिनंदन
पाकिस्तानला पराभूत केल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच भारतीय क्रिकेपटून विराट कोहलीने अभिनंद केले आहे. सचिन तेंडुलकरने हा सामना पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत पाहिल्याचे सांगितले. तसेच जेमिमाह, ऋचाचेही सचिन तेंडुलकरने कौतुक केले.
जेमिमाह ठरली सामनावीर, भारताचा सात गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.