मुंबई : एनकेजीएसबी बँकेने मुंबै बँकेचा दहा गडी राखून पराभव केला आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सलामीवीर मोहित म्हात्रेच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे एनकेजीएसबी को-ऑप. बँकेचा विजय सुकर झाला. स्पर्धेमध्ये मोहित म्हात्रेने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, मिनील सावंतने उत्कृष्ट फलंदाजीचा तर प्रसाद मिराशीने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळविला.
शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबै बँकेला ३९ धावसंख्येवर नियंत्रित ठेवण्यामध्ये एनकेजीएसबी बँकेचे गोलंदाज यशस्वी ठरले. विजयी ४० धावांचे लक्ष्य मोहित म्हात्रेच्या (११ चेंडूत ३६ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळे एनकेजीएसबी बँकेने एकही विकेट न गमावता २.३ षटकात सहज पार केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. प्रसाद मिराशीने अचूक गोलंदाजी करूनही मुंबै बँकेला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत अष्टपैलू मोहित म्हात्रे व भक्तिदास यांच्या खेळामुळे एनकेजीएसबी बँकेने हिंदुस्थान को-ऑप. बँकेवर १० विकेटने तर प्रसाद मिराशीच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबै बँकेने सिटी को-ऑप. बँकेवर ९ विकेटने सहज मात केली. पारितोषिक वितरण समारंभ क्रिकेटपटू सुलक्षण कुळकर्णी यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, प्रवीण शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यरत होते.