पुणे : पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. पुण्यासह एकूण 18 जिल्ह्यांना भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे हा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात जुलैच्या सुरुवातीला सुरू झालेला पाऊस महिन्याच्या मध्यापर्यंत जोरदार बरसला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर तो काही जिल्ह्यांत कमीही झाला. आता पुन्हा पाऊस जोर धरणार असून पुढचे तीन दिवस मुसळधार स्वरुपात कोसळणार आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. एकूण 18 जिल्ह्यांना (Districts)हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 0 मिमी पावसाची नोंद या 24 तासांत झाली आहे.
जिल्हा प्रशासन सतर्क
राज्यात काही जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली होती. काही जिल्ह्यांत मात्र पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. पीकांचे नुकसान झाल्याने एकीकडे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अनेक ठिकाणी इमारती कोसळून आर्थिक हानी काही नागरिकांची झाली. अशा स्थितीत पावसाने काहीशी उसंत घेतली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. पुण्यासह एकूण 18 जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाले आहे.
28 जुलैनंतर पावसाचा जोर होणार कमी
पुणे आयएमडी, हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, की अरबी समुद्रातील पश्चिमेकडील प्रवाह अंशतः मजबूत झाला. त्यामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे पावसाच्या पाण्याने युक्त होणार आहेत. 26 जुलैपर्यंत पुण्याच्या आसपासच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कश्यपी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिली होती. तर 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले होते.