नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी घेतल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात संथ झाली कारण सातव्या षटकात हर्षिता समरविक्रमा (20 चेंडू 8) 28 धावांवर बाद झाली. येथून चमारी अटापट्टूने विश्मी गुणरत्ने (35) सोबत 86 धावांची भागीदारी करत संघाला 16 व्या षटकात 100 च्या पुढे नेले. मात्र, दोन्ही फलंदाज 114 धावांवर बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ 130 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने ते मागे पडले आणि शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार सुने लुसने सर्वाधिक 28 धावा केल्या, तर शेवटी सिनालो जाफ्ताने 15 धावांची खेळी केली पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. 10व्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावल्या होत्या आणि 13व्या षटकात तीन चेंडूत दोन विकेट गमावल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
श्रीलंकेकडून इनोका रणवीराने तीन, तर ओशादी रणसिंघे आणि सुगंधिका कुमारीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
टीम इंडियाचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानशी
महिला टी-20 विश्वचषकात आज गट ब मध्ये वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी तर अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना 13 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी होईल, तर श्रीलंकेचा पुढचा सामना 12 फेब्रुवारीला बांगलादेशशी होईल. भारतीय संघाचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे.