कोल्हापूर येथील आजारा तालुक्यातील बहिरेवाडी येथे एका मुलाने आपल्या आई वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : कोल्हापूर येथील आजारा तालुक्यातील बहीरेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आई वाडिलांवर प्राणघातक हल्ला केला असून यात वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेत आई गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला केल्यानंतर मुलगा माळ्यावर जाऊन शांत झोपला होता.
कृष्णा बाबू गोरुले (वय ६५) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर सचिन कृष्णा गोरुले (वय ३२, रा. बहिरेवाडी, ता. आजरा) असे आरोपी मुलाचे नाव आहे. सचिन हा मानसिक रुग्ण आहे. त्यातून त्याने हा हल्ला केला असावा अशी अशक्यता आहे. तो त्याच्या आई वाडिलांसोबत शाळेजवळ राहतो. सचिन हा कागल येथे औद्योगिक वसाहतीत काम करत होता. त्याचे लग्न देखील झाले होते. मात्र, त्याचा घटस्फोट झाला.
यानंतर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्यामुळे तो त्याच्या आई-वडिलांसोबत भांडण करायचा. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरात झालेल्या वादानंतर सचिनने आईवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आपला जीव वाचविण्यासाठी ती घरातून बाहेर पळत आली. मात्र सचिनने घराचे दरवाजे बंद करून घेत वडील कृष्णा बाबू गोरुले यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. जखमी आईने बाहेर जाऊन मदतीसाठी नागरिकांना बोलावले. खुनाची बातमी कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांनी सुरुवातीला जखमी महिलेला खासगी वाहनाने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पोलिसांना माहिती कळवताच काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी आरोपी मुलास ताब्यात घेत अटक केली आहे.