MUMBAI : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-वडाळा संघाने मुलांचे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-विक्रोळी संघाने मुलींचे विजेतेपद पटकाविले. पहिल्या डावात पिछाडीवर राहून देखील आंध्रा एज्युकेशनने गिरगावच्या मारवाडी हायस्कूलला ७१-५२ असे नमविले. मुलींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने मालाडच्या उत्कर्ष मंदिर माध्यमिक शाळेचा ५१-२६ असा पराभव केला.
दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मंदिर परिसरात आंध्रा एज्युकेशन विरुद्ध डॉ. आंबेडकर शालेय संघामधील अंतिम लढत प्रत्येक चढाईतील जोशपूर्ण खेळामुळे शतकी गुणांनी रंगला. सुमित यादवच्या दमदार चढायांमुळे मारवाडी हायस्कूलने पहिल्या डावात ३३-३० अशी आघाडी घेतली. परंतु चढाई बहाद्दर शिवम यादव, शिवकुमार व राज गुप्ता यांनी आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्ध्यांचे दोन लोण फिरवून उत्तरार्धात अधिक दोन लोण दिले. परिणामी आध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने ७१-५२ असा चुरशीचा विजय मिळवीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. स्पर्धेमध्ये शिवम यादवने सर्वोत्तम खेळाडूचा, सुमित यादवने उत्कृष्ट चढाईचा तर देवांग जैसवारने उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार पटकाविला.
कप्तान माऊली पार्टेचा अष्टपैलू खेळ व विदिका यादवच्या बहारदार पकडीमुळे प्रारंभापासून वर्चस्व राखणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने उत्कर्ष मंदिरचे आव्हान ५१-२६ असे संपुष्टात आणून अंतिम फेरी जिंकली. मुलींच्या स्पर्धेत उत्कर्ष मंदिरच्या शलाका मर्ढेकरने सर्वोत्तम खेळाडूचा, माऊली पार्टेने उत्कृष्ट चढाईचा तर पायल कांचनने उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार मिळविला. समर्थ व्यायाम मंदिरचे प्रमुख कार्यवाह उदय देशपांडे, श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप साठे, प्रकाश परब, डॉ. अरुण भुरे, मधुकर प्रभू, अविनाश नाईक, राजेंद्रकुमार वैद्य, गुरुनाथ पांगम, किरण पाटकर, विजय साखरकर व व्यवस्थापक संजय आईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.