mumbai : सुवर्ण चढाईत शिवम यादवने मिळविलेल्या दोन गुणांच्या बळावर आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने उत्कर्ष मंदिर माध्यमिक शाळेचा ४९-४७ असा पराभव केला आणि श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मंदिर परिसर मैदानात मुलांमध्ये शारदाश्रम इंग्लिश मिडीयम स्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय, मारवाडी विद्यालय तर मुलींमध्ये विकास हायस्कूल, उत्कर्ष मंदिर माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, श्री गौरीदत्त मित्तल स्कूल संघांनी उपांत्य फेरी गाठली.
अतिशय चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत चढाई बहाद्दर श्रवण बडदेच्या अप्रतिम खेळामुळे उत्कर्ष मंदिरने दुसऱ्या डावातील शेवटच्या तीन मिनिटापर्यंत ४२-३९ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर रियाज मंडलच्या फसव्या चढाईने उत्कर्ष मंदिरचे तीन गडी बाद केले आणि आंध्र एज्युकेशनने ४२-४२ अशी बरोबरी अखेरपर्यंत साधली. परिणामी पाच-पाच चढाया देऊन देखील सामना ४७-४७ अशा बरोबरीत राहिला. अखेर सुवर्ण चढाई करणाऱ्या शिवम यादवने कोपरारक्षकाची साखळी टिपत आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या विजयावर ४९-४७ असा शिक्कामोर्तब केला.
अन्य सामन्यात शारदाश्रम इंग्लिश मिडीयम स्कूलने श्री गुरुदत्त मित्तल स्कूलचा ४७-२८ असा, छत्रपती शिवाजी विद्यालयाने श्री गणेश विद्यालयाचा ४२-२२ असा, मारवाडी विद्यालयाने डी.एस. हायस्कूलचा ५४-४१ असा तर मुलींमध्ये विकास हायस्कूलने टिळकनगर म्युनिसिपल हायस्कूलचा ३०-२ असा, उत्कर्ष मंदिर माध्यमिक शाळेने एसआयइएस हायस्कूलचा ४४-३८ असा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने शारदाश्रम विद्या मंदिरचा ५६-२७ असा, श्री गौरीदत्त मित्तल स्कूलने जनता शिक्षण संस्था शाळेचा ४८-३१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी जिंकली.