आज राहुलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया कसा राहिला त्याचा करिअर ग्राफ –
ब्लॅकमध्ये विकल्या गेली होती चित्रपटाची तिकिटे
काही वर्षांपूर्वी आशिकी या चित्रपटातील कलाकार राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. या वेळी टीमने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. राहुल रॉयने सांगितले होते की, माझी या चित्रपटात निवड करण्यासाठी महेश भट्ट यांनी हट्ट धरला होता. मी भट्ट साहेबांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा त्यांना माझी हेअर स्टाइल आणि ड्रेसिंग खूप आवडली होती. ते मला या चित्रपटासाठी साइन करणार होते, तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक मला प्रमुख भूमिका दिल्यामुळे मला यात घेऊ नका आणि हा प्रयोग अपयशी ठरेल असे महेश यांना सांगत होता. यापैकी बहुतांश लोक म्हणाले होते की, मी नायकासारखा दिसत नाही. मला आठवते, माझे केस विखुरलेले होते. यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे झाकले जात होते. तरीदेखील भट्ट साहेब मला चित्रपटात घेण्यावर ठाम होते.’
राहुलने पुढे सांगितले होते की, हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी भट्ट साहेबांसोबत अनेक चित्रपटांच्या सेट्सवर जात होते, जेणेकरून अभिनेत्यांकडे पाहून दिग्दर्शन आणि अभिनयातील बारकावे शिकता येतील. मी अनुपम खेर, मीनाक्षी शेषाद्री आदी दिग्गज कलावंतांचे काम त्या वेळी पाहत होतो. भट्ट साहेबांनी नेहमीच आपल्या मनाचे ऐकले आणि ‘आशिकी’साठी मला प्रमुख भूमिका दिली. त्यानंतर जे घडले तो इतिहास बनला. हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा लोक तो पाहण्यासाठी खूप उत्सुक होते, हे मला त्या वेळी कळले. लोक ब्लॅकमध्ये 1500 रुपयांना चित्रपटाची तिकिटे खरेदी करत होते.
21 निर्मात्यांचे पैसे करावे लागले होते पर
आणखी एका मुलाखतीत राहुलने आशिकीविषयी सांगितले होते, ‘आशिकी हा चित्रपट सहा महिने हाऊसफूल होता. मात्र त्याचा फायदा मला होताना दिसत नव्हता. म्हणून मी काळजीने महेश भट्ट यांच्याकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले होते की, लोक तुला आता बघत आहेत. तुला पडद्यावर कसे सादर करावे, याचा ते विचार करत आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी माझ्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. मी फक्त 11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले होते. एकादिवशी मी तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग करायचो. नंतर माझ्या लक्षात आले की, मी खूप चित्रपट साइन केले आणि एकाचवेळी या सर्वांचे चित्रीकरण करणे मला शक्य होणार नाही. म्हणून मी 21 निर्मात्यांना त्यांचे पैसे परत केले होते.’
जेव्हा मीडियाने आईसोबतच अफेयर असल्याच्या बातम्या केल्या होत्या प्रकाशित
राहुल रॉयला त्याच्या आयुष्यात एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. याविषयीचा खुलासा स्वतः त्याने एका मुलाखतीत केला होता. राहुलने सांगितले होते, “एकदा मी बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलो. तेथी माझी आई आली. माझी आई खुप सुंदर होती. तीसुध्दा तिच्या मित्रांसोबत तेथे आली. तिने मला तिथे पाहिले तर म्हणाली की, आपण सोबत डान्स करु आणि पुढच्या दिवशी मीडियाने अशी बातमी छापली. वृत्तपत्रात बातमी आली की, राहुल राय एका वयस्कर महिलेसोबत डान्स करताना दिसला आणि या महिलेसोबत त्याचे अफेयर आहे.” राहुल पुढे म्हणाला, की माध्यमांनी एकदा मला विचारायला पाहिजे होते, की ती महिला माझी कोण होती.
घटस्फोटित आहे राहुल रॉय
एकेकाळी राहुल रॉयचे अफेअर खूप चर्चेत होते. राहुल घटस्फोटित आहे. तीन अफेअरमुळेही तो चर्चेत आला होता. राहुल रॉयचे बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टबरोबर अफेअर होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. या चित्रपटांच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. पण काही कारणांमुळे दोघे वेगळे झाले होते. याशिवाय मनीषा कोईरालासोबतचेही त्याचे अफेअर गाजले होते. त्यानंतर सुमन रंगनाथनही राहुल रॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यांचे नातं फार काळ टिकले नाही. यानंतर 1998 मध्ये राहुल रॉय राजलक्ष्मी खानविलकरला भेटला, दोघांनी 2000 मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
बिग बॉस सीझन वनचा विजेता ठरला होता राहुल
राहुल 2007 मध्ये बिग बॉस सीझन 1 चा विजेता ठरला होता. त्याने ‘हर स्टोरी’ या सी-ग्रेड चित्रपटातही काम केले होते. राहुलने यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये सपने साजन के, पहला नशा, गुमराह, भूकंप, हंसते-खेलते, नसीब, अचानक फिर कभी, नॉटी बॉय आणि क्राइम पार्टनर सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 2015 मध्ये ‘2 बी ऑर नॉट टू बी’ हा चित्रपटही त्याने केला होता. या अगोदर तो 2010 मध्ये आलेल्या ‘अदा अ वे ऑफ लाइफ’ या लघुपटात दिसला होता.
शूटिंग दरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोक
दोन वर्षांपूर्वी राहुल कारगिलच्या मायनस 12 डिग्री तापमानात गलवान व्हॅलीवर आधारित ‘एलएसी-लाइव्ह द बॅटल’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यानंतर बरेच दिवस मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. सध्या राहुलने चित्रपटांपासून ब्रेक घेतला आहे.