MUMBAI : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे सुरु झालेल्या ५५ किलो वजनापर्यंतच्या १७ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेत श्री गणेश विद्यालय, टिळक नगर मनपा हिंदी शाळा, सानेगुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, डी.एस.हायस्कूल संघांनी सलामीचे सामने जिंकले. श्री गणेश विद्यालयाने सनराईज इंग्लिश स्कूलचा ४५-३७ असा पराभव करतांना आर्यन म्हस्के चढाईत चमकला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. तुषार रेगे, विश्वस्त अविनाश नाईक, विश्वस्त गुरुनाथ पांगम, विश्वस्त डॉ. अरुण भुरे, डॉ. विजय शृंगारपुरे, डॉ. यशस भुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसर मैदानात टिळकनगर मनपा हिंदी शाळेने डॉ.डी.बी. कुळकर्णी विद्यालयावर ५६-१६ असा मोठा विजय मिळविला. विजयी संघाच्या यशात योगेश पटेलच्या चढाया व आमीर शेखच्या पकडी मौलिक ठरल्या. अन्य सामन्यात डी.एस. हायस्कूलने शिशु विहार माध्यमिक विद्यालयाला ३९-२२ असे, छत्रपती शिवाजी विद्यालयाने आयइएस मॉर्डन इंग्लिश स्कूलला ४१-३३ असे, साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलने एफेक इंग्लिश स्कूलला ५३-३२ असे तर ताराबाई मोडक हायस्कूलने श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलला ४२-३७ असे हरवून दुसरी फेरी गाठली.