श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे ८ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ५५ किलो वजनापर्यंतच्या १७ वर्षाखालील मुलामुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेत एकूण शालेय ४८ संघांमध्ये चुरस होणार आहे. स्पर्धेची उद्घाटनीय लढत छत्रपती शिवाजी विद्यालय-धारावी विरुध्द मॉर्डन इंग्लिश स्कूल-दादर आणि श्री गणेश माध्यमिक शाळा-वडाळा विरुद्ध सनराईस इंग्लिश स्कूल-वरळी यामध्ये डॉ. तुषार रेगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी ९.०० वा. होईल. दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसरात ९ फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱ्या स्पर्धेतील सर्व खेळाडूना मोफत टी शर्ट व अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री उद्यानगणेश चषक पटकाविण्यासाठी शालेय मुलांमध्ये शारदाश्रम विद्यामंदिर, मारवाडी विद्यालय, सर एली कदुरी हायस्कूल, एफेक इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, अँटोनी डिसोझा हायस्कूल, श्री गौरीदत्त मित्तल विद्यालय, मराठा हायस्कूल, सेंट मेरी हायस्कूल, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल, ताराबाई मोडक स्कूल, डॉ. अँटोनी डीसिल्वा हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय, उत्कर्ष मंदिर माध्यमिक आदी ३० संघांमध्ये तर शालेय मुलींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, शारदाश्रम विद्यामंदिर, जनता शिक्षण संस्थेचे हायस्कूल, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल, श्री गौरी दत्त मित्तल हायस्कूल, टिळकनगर म्युनिसिपल हिंदी शाळा, मराठा हायस्कूल, एसआयइएस हायस्कूल, विकास हायस्कूल आदी १८ संघ लढणार आहेत. मुले व मुली विभागातील प्रत्येक अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/- व चषक, अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/- व चषक आणि तृतीय क्रमांकास रोख रु.२,०००/- पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती विश्वस्त प्रकाश परब व व्यवस्थापक संजय आईर यांनी दिली.