मुंबई : अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै. ‘महानगरी टाईम्स’चे झुंजार पत्रकार श्री. शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली असून मुंबई मराठी पत्रकार संघ या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
श्री. वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी दि. ६ फेब्रुवारी, २०२३ च्या ‘महानगरी टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो असल्याची ती बातमी होती. तो आरोपी म्हणजे रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणार्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर होय. याच आंबेरकरने सोमवारी दु. १.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे.
वारीशे यांना आधी रत्नागिरी येथे आणि नंतर बेशुद्धावस्थेत कोल्हापूर येथे हलविण्यात आले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. आज सकाळी ७.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. किंबहुना, अशी मागणी करणारे पत्र पत्रकार संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे.