अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातून अदानी समूहावर सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अदानी समूहाला मोठा हादरला बसला. अदानी समूहाकडून जरी हे गंभीर आरोप फेटाळण्यात आले असले तरी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमवीर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. देशात ५० वर्षात इतका मोठा आर्थिक घोटाळा घडला नसून यात थेट भाजपचा संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त करण्याचे काम भाजपने केले आहे. स्टॉक एक्ससेंज आणि शेअर बाजार याच्यावर देशाची अर्थव्यवस्था ठरवण्याचे काम जे सुरू आहे, त्याच्या सामान्य जनतेसोबत काडीमात्र संबंध नाही. पण सामान्य जनतेचे पैसे अत्यंत विश्वासाने भारतीय आयुर्विमात, एलआयसी, स्टेट बँक जी सरकारी बँक आहे, त्याच्यामध्ये जे नोकरदारांचे पैसे आहेत, त्या पैशांचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.’
संसदेत आवाज उठवणार
पुढे राऊतांनी सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात यासंदर्भात गुरुवारी विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील पाऊल काय उचलले पाहिजे याची चर्चा केली जाणार आहे.
एकाही भाजप नेत्याने अजूनही आवाज का उठवला नाही?
गेल्या ५० वर्षात इतका मोठा आर्थिक घोटाळा या देशात घडला नव्हता. ज्या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय ज्याप्रकारच्या धाडी घालतात, त्यात मनी लाँड्रिंग आणि शेल कंपन्या दाखवल्या जातात. मग आता प्रकरण उद्योगपतीचे समोर आले आहे. त्याच्यामध्ये सिंगापूर, मॉरिशसमध्ये शेल कंपन्या आहेत. यावर एकाही भाजप नेत्याने अजूनही आवाज का उठवला नाही? फक्त विरोधकांवर आरोप करून त्यांना कैदेत ठेवण्यासाठी तुरुंग बनवले आहेत का?, असे सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना केले.