शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वेडची जादू कमी होईल असे म्हटले जात होते. मात्र रितेशने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळून ठेवले आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमावला आहे. अशातच रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने किती रुपये कमावले? चित्रपट थिएटरमध्ये सुरु आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
मराठमोळ्या रितेशच्या ‘वेड’ची क्रेझ कायम आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने ५७.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २०.१८ कोटी कमावले, तिसऱ्या आठवड्यात ९.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आणि आता चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने ६.११ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘वेड’ या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे.