मुंबई: मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील नमाहा हॉस्पिटलमधील सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ अपर्णा गोविल भास्कर यांच्या नेतृत्वाखालील टिमने २६२ किलो वजनाच्या ३८ वर्षीय व्यक्तीवर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली. या रुग्णाला टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप एपनिया, ओटीपोटाचा सेल्युलायटिस, संधीवात आणि व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होता. कांदिवली पश्चिम येथील नमाहा हॉस्पिटलमध्ये रुग्णाची लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व व्याधींवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. शस्त्रक्रियेनंतर ४ आठवड्यातच त्याने ४१ किलो वजन कमी केले असून त्याचे वजन आता २२१ किलो आहे.
कांदिवली येथील रहिवासी श्री कल्पेश लिंबाचिया हे लठ्ठपणाने त्रासले होते. वजन कमी करण्यासाठी त्यांनी अनेक पर्यायांचा वापर केला मात्र ते यशस्वी झाले नाही. लॉकडाऊनच्या काळात त्यांचे वजन अतिशय वेगाने वाढले. डिसेंबर २०२२ मध्ये त्याचे वजन २६२ किलो पर्यंत वाढले होते. वाढत्या वजनासोबतच त्यांना इतर अनेक आजाराने ग्रासले. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यांच्या आरोग्यविषयक सर्वच समस्यांमुळे त्यांना नोकरी देखील सोडावी लागली.
स्थुलता आणि त्यामुळे मंदावलेली हालचाल आणि इतर व्याधी यामुळे कुटुंबियांनी या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केली आणि त्यांना कांदिवली पश्चिम येथील नमाहा हॉस्पिटलमधील बॅरियाट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांच्याकडे उपचाराकरिता जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वजन कमी करणयासाठी ही एक एक प्रभावी आणि वैदयकीयदृष्टया सुरक्षित पद्धत म्हणून ओळखली जात आहे.
डॉ अपर्णा गोविल भास्कर सांगतात की, पहिल्यांदा श्री लिंबाचिया यांच्याशी भेट झाली तेव्हा ते खुप क्वचित चालू शकत होते. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होता आणि त्यांच्या पायांवर आणि पोटाच्या खालच्या भागात सेल्युलायटिस झाला होता. तसेच त्यांना अनेक इतर व्याधीही होत्या. त्यांना ओटीपोटात अतिरिक्त चरबी आणि चयापचय समस्या दिसून आल्या. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा त्याच्यासाठी एकमेव पर्याय होता.
श्री.लिंबाचिया यांना शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यासाठी, बॅरिएट्रिक आहारतज्ञ डॅा मरियम लकडावाला यांनी विशेष प्रयत्न केले. शस्त्रक्रियेपूर्वीचे ४ आठवडे रुग्णाला उच्च प्रथिनेयुक्त द्रव आहारावर ठेवण्यात आले होते. अती लठ्ठपणा असलेल्या रूग्णांना शस्त्रक्रिया करण्यापुर्वी पोषक आहार सुरु करणे आवश्यक आहे असे डॉ लकडावाला म्हणाल्या.
डॉ. तेजस मेहता, नमाहा हॉस्पिटलचे फिजिशियन म्हणाले की, श्री कल्पेश लिंबाचिया यांच्यावर टाईप 2 मधुमेह आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अँप्नीया (OSA) इत्यादी सर्व सह व्याधींवर उपचार केले. स्लीप अँप्नीया ही गंभीर बाब आहे आणि अति लठ्ठपणात साधारणपणे ही स्थिती दिसून येते पंरतू त्यांचे निदान चटकन होत नाही. डॉ. मेहता म्हणाले शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला पुर्वपदावर येण्यास मदत करण्यासाठी या संबंधित परिस्थितीला शस्त्रक्रियेपूर्वी नियंत्रित करणे आवश्यक आहे.
२० डिसेंबर २०२२ रोजी रुग्णावर लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीच्या रूपात बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ अपर्णा भास्कर पुढे सांगतात की, ओटीपोटात जास्त चरबी आणि यकृताचा मोठा आकार यामुळे शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होती. ही शस्त्रक्रिया ३ तास चालली, त्यानंतर रुग्णाला एक दिवस अती दक्षता विभागात ठेवण्यात आले जेणेकरून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल. डॉ. योगेन भट आणि डॉ. कल्पेश शहा यांच्या ऍनेस्थेसिया टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या हाताळली. ऍनेस्थेसिया दरम्यान अशा प्रकरणांमध्ये कार्बन डायऑक्साईड टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असू शकते आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे असे डॉ. भट म्हणाले.