चित्रपट महोत्सव, चित्रपट निर्मात्यांसाठी एकत्र येण्याची आणि जागतिक चित्रपटसृष्टीचे अनुभव घेण्याच्या उत्तम संधी प्रदान करतो : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागचा भारताचा उद्देश चित्रपटांमधील वैविध्य आणि एससीओ प्रदेशातील चित्रपट निर्मितीच्या शैली दाखवण्याचा आहे : माहिती आणि प्रसारण मंत्री
शांघाय सहकार्य संघटनेतील सर्व देशांमध्ये भारतीय चित्रपटांचे वेड आहे, या सर्व देशांमधील लोकांना जोडण्यात चित्रपटांची भूमिका महत्वाची आहे. : माहिती आणि प्रसारण मंत्री
कथा सांगण्याच्या, समाजमन तयार करण्याच्या, एकमेकांची हृदये जवळ आणण्याच्या या महोत्सवात, या प्रदेशातील सर्व सदस्य मित्र देशांना प्रतिनिधित्व मिळेल : परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री
भारतातील एससीओ चित्रपट महोत्सवाच्या या पहिल्याच वर्षी, स्पर्धा तसेच स्पर्धाबाह्य अशा दोन्ही विभागात, 14 देशांमधील 58 चित्रपट दाखवले जाणार
मुंबई, 27 जानेवारी 2023
मुंबईच्या एनसीपीए सभागृहात चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत आणि भारताच्या वैविध्यतेचे दर्शन घडवणाऱ्या बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या सुंदर संध्याकाळी आज शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची अत्यंत दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली.
भारतीय चित्रपटसृष्टीतील तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील लोकप्रिय चित्रपट कलावंतासह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.
उद्घाटन समारंभासाठी उपस्थित मान्यवर पाहुणे, अभिनेत्री हेमामालिनी आणि अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, साजिद नाडियाडवाला, ईशा गुप्ता, पूनम ढिल्लों, एली अवराम, हृषिता भट्ट आणि जॅकी भगनानी यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचे सात ज्युरी सदस्य – चीनच्या चित्रपट दिग्दर्शक निंग यिंग; कझाकस्तानमधील संगीतकार दिमाश कुडैबर्गेन; किरगिझस्तानमधील चित्रपट निर्मात्या आणि चित्रपट समीक्षक गुलबरा तोलोमुशोवा; रशियन चित्रपट निर्माता आणि पत्रकार इव्हान कुद्रियावत्सेव; ताजिकिस्तानचे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक मेहमेदसैद शोहियोन; उझबेकिस्तानचे अभिनेते मेहमेदसैद शोहियोन आणि ज्यूरीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता राहुल रवैल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव, चित्रपट निर्मात्यांना अनोख्या संधी आणि नेटवर्क, सहयोग यासाठी अपार शक्यता त्याचबरोबर जगातले सर्वोत्तम चित्रपट अनुभवण्याची संधी देतो, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर स्वागतपर भाषणात सांगितले.
एससीओचे भारताचे अध्यक्षपद दर्शवण्यासाठी एससीओ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि एससीओशी संबंधित देशांमधल्या चित्रपटांचे वैविध्य आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली यांचे दर्शन घडवणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट विषयक भागीदारी उभारणे, कार्यक्रमांची देवाण-घेवाण, चित्रपट निर्मितीमधल्या युवा प्रतिभेची जोपासना आणि या अनोख्या प्रांतामधल्या संस्कृतीना जोडण्यासाठी दुवा म्हणून काम करणे हा उद्देशही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकतेची भावना, चित्रपट कलेला प्रोत्साहन, चित्रपट विषयक भागीदारी यासह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट जगत, उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि एससीओ देशांमधल्या सिनेप्रेमीना हा चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपट विषयक एकत्रित अनुभव देणे हा एससीओ आणि एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांचा हेतू आहे. नेटवर्क निर्मितीसाठी वेग देणे आणि भारतीय चित्रपटांना अधिकाधिक वाव मिळावा हे या एससीओ चित्रपट महोत्सवाच्या केंद्रस्थानी असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी सांगितले.
एससीओच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात हा महोत्सव म्हणजे सळसळत्या संस्कृती, नितांत सुंदर संवेदनशीलता आणि निखळ सिनेमाविषयक अनुभव यांचा सुंदर मेळ घालण्यासाठी भारताची सज्जता झाली आहे. समकालीन प्रासंगिक समस्या यावर चर्चा करण्यासाठी या मंचाचा उपयोग व्हावा ज्यायोगे सध्याच्या शतकातल्या आणि आपल्या लोकांच्या वास्तवाचे अचूक दर्शन चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला घडेल असे त्यांनी सांगितले.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) प्रदेशातील सिनेमा
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “SCO प्रदेश हा विविध संस्कृतींचा संगम आहे आणि कला आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरांचा उगम आहे. SCO च्या सदस्य देशांमध्ये बनवलेल्या चित्रपटांमध्ये हे प्रतिबिंबीत झालं आहे आणि यांचं जागतिक स्तरावर कौतुक आणि सन्मान झाला आहे.” “वर्षानुवर्षे चालत आलेलं आपलं लोकजीवन, संस्कृती आणि परस्पर सहकार्य यांचं दर्शन घडवणारे चित्रपट, आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि एकत्र मिळून तयार केले पाहिजेत,”असं त्यांनी SCO च्या सदस्यांना आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये मुंबईत भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाष्य केलं होते की, चित्रपट आणि समाज हे एकमेकांचं प्रतिबिंब आहे. तुम्ही चित्रपटांमध्ये जे पाहता ते समाजात घडत असतं आणि समाजात जे घडतं ते चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या या टिप्पणीचीहीं यावेळी आठवण करून दिली.
देशाची समृद्ध संस्कृती, ठेवा, वारसा, आशा आणि स्वप्ने, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि संक्रमणावस्थेत असलेल्या देशाची कालातीत वाटचाल यांचा चित्रपट संगम साधतो आणि त्याला सूत्रबद्ध आकार देतो, अशा शब्दात मंत्र्यांनी चित्रपटाची महती सांगितली. “चित्रपट खऱ्या अर्थाने समाज, संस्कृती, व्यवस्थेतील विरोधाभास यांचा अर्क टिपतो आणि आपल्या सामूहीक विवेकाचं प्रतिबिंब चित्रपटाच्या अनेक अंगांमधून दाखवतो”, असं ते पुढे म्हणाले.
भारतीय चित्रपट
“आम्ही भारताला चित्रपटांसाठी विषय पुरवणारं आणि निर्मितीनंतर चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी सज्ज आहोत. हे केंद्र आमच्या चित्रपट निर्मितीच्या सर्जनशील प्रतिभांच्या हुशारीनं आणि ध्यासानं भारलेलं असेल!”, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. त्यांनी पुढे असंही सांगितलं की केवळ एका शतकभरातच भारतीय चित्रपटानं सीमा ओलांडल्या आहेत आणि भारतीय चित्रपटाकडे केवळ एक कला म्हणून नाही तर जगभरातील लोक आणि संस्कृतींना जोडण्याचं आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचं एक शक्तिशाली माध्यम म्हणून पाहिलं जातं.
“आम्ही चित्रपटांचे जगातील सर्वात मोठे निर्माते आहोत, चित्रपटातून सतत नवनवीन माहिती देत आहोत आणि नवनवीन विषय मांडत आहोत आणि जगातील काही नावाजलेल्या चित्रपटांचं अॅनिमेशन-VFX (वास्तव चित्रीकरणाला अॅनिमेशनची जोड) करण्यासाठी आम्हाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.”, असं त्यांनी सांगितलं.
जगभरातील चित्रपट उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्जनशील मने, तंत्रज्ञान प्रतिभा, कुशल मनुष्यबळ, किमतीची कार्यक्षमता आणि जागतिक दर्जाच्या पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा यांचा मोठा समुदाय भारताक़डे आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. “आपली ‘सर्जनशील अर्थव्यवस्था’ ओटीटी व्यासपीठाचा फायदा घेत आहे; मोदी सरकारची धोरणेही भविष्यातील गरजा विचारात घेणारी आणि उद्योगाच्या गरजांसोबत गती कायम राखणारी आहेत.”, असे त्यांनी सांगितले. भारताने 12 प्रमुख सेवा क्षेत्रांपैकी एक’ म्हणून दृक श्राव्य सेवेला अधिकृतपणे नामांकित केले आहे आणि उद्योगातील दिग्गज कंपन्यांचा समावेश असलेल्या एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग ॲण्ड क़ॉमिक्स) कृती दलाने या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एक आराखडा सामायिक केला आहे. गेल्या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात, भारताने चित्रपट निर्माते आणि आशय निर्मात्यांना भारतात चित्रीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दोन योजना जाहीर केल्या. दृकश्राव्य सह-निर्मितीसाठी प्रोत्साहन योजना आणि भारतात परदेशी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रोत्साहन योजना आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले. “या योजना खरोखरच एससीओ क्षेत्रांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकतात”, असे ते म्हणाले.
“भारतीय चित्रपटांना एससीओ देशांमध्ये प्रचंड मागणी आहे आणि त्यांनी या देशांमधील जनतेमध्ये परस्पर संपर्क वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे”, असे त्यांनी सांगितले. या देशांनी भारतीय चित्रपटांबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी प्रतिनिधींचे आभार मानले. भारतीय चित्रपट मध्य आशियाई देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, असे त्यांनी नमूद केले.
1957 मध्ये मदर इंडिया हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय ठरला आणि अभिनेता-दिग्दर्शक राज कपूरसाठी मॉस्को आणि बीजिंगच्या रस्त्यावर रसिक प्रेमाने गर्दी करत होते. राज कपूर यांचा ‘आवारा’ हा पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या बॉलिवुड चित्रपटांपैकी एक होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
“दिलीप कुमार, देवआनंद आणि नर्गिस यांचे यापैकी अनेक देशांमध्ये लाखो चाहते होते. 1970 आणि 1980 च्या दशकात, बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या असंख्य हिट आणि जोरदार संवादांनी सीमापार वेड लावलं होतं! मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचे नृत्य एससीओ देशांत लोकप्रिय आहेत. आणि त्या भागामध्ये त्यांची सातत्याने आठवण काढली जाते, याची कशाचीच तुलना होणार नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “बाहुबलीचे अॅक्शन पॅक्ड सीक्वेन्स प्रचंड लोकप्रिय होते आणि नायक अजय देवगण ची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम’ ने देखील अभिनय, कथानक आणि कथेचा विषय यासाठी शांघाय सहकार्य संघटना क्षेत्रामध्ये अनेक चाहते मिळवले होते!”
केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की अलीकडेच त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या युवा शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी विविध भारतीय गाणी गायली आणि राज कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या काळातील काही लोकप्रिय गाण्यांच्या तालावर नृत्य केले. “हीच सिनेमा आणि चित्रपटसृष्टीची ताकद आहे!” कझाकस्तानमधील लोकप्रिय मेलोमन संगीत शृंखलेत आणि सीडी दुकानांमध्ये भारतीय चित्रपटांसाठी एक विशेष स्थान आहे, असेही ते म्हणाले. राज्यमंत्री (परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक) मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, या चित्रपट महोत्सवाद्वारे बहुपक्षीय संस्था असलेल्या आणि शेजारील देशांमध्ये आवश्यक असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य करणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही या प्रदेशात स्नेहबंध प्रस्थापित करत आहोत. 17 सप्टेंबर 2022 रोजी भारताने एससीओ देशांचे अध्यक्षपद स्वीकारले. हा चित्रपट महोत्सव एससीओ सोहोळ्याचा एक भाग आहे. “कथाकथन, कथानक निर्मिती, परस्परांना जाणून घेण्याच्या या उत्सवात या भागातील आमच्या सर्व मित्रांना प्रतिनिधित्व मिळेल कारण जोपर्यंत आपण सर्व एकमेकांना समजून घेऊन परस्परांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार नाही तोपर्यंत ऐक्य निर्माण होणार नाही,” त्या म्हणाल्या. रंगभूमीची व्याख्या उलगडणाऱ्या ‘नाट्यशास्त्र’ या प्राचीन भारतीय ग्रंथाचा संदर्भ देत, लेखी म्हणाल्या, भारताला कथाकथनाची मोठी परंपरा आहे.
खासदार (मुंबई ईशान्य मतदारसंघ), मनोज कोटक, खासदार (मुंबई उत्तर मतदारसंघ) गोपाळशेट्टी, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री, मंगलप्रभात लोढा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय अतिरिक्त सचिव (चित्रपट) नीरजाशेखर आणि महोत्सव संचालक आणि एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतात होत असलेल्या पहिल्या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक अशा दोन्ही विभागात 14 देशांचे 58 चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘अप्पाथा’ या तमिळ चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाचा प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिग्दर्शक प्रियदर्शन आणि प्रमुख अभिनेत्री उर्वशी या दोघांचाही चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी सत्कार केला.
***
S.Patil/R.Aghor/N.Chitale/A.Save/P.Jambhekar/V.Joshi/S.Paitl/P.Kor