राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, २७ जानेवारी २०२३: लेखक, व्यवसाय प्रशिक्षक आणि जागतिक व्यूहरचनाकार मनोज गुरसहानी यांच्या ‘द ह्युमन कनेक्ट’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत झाले. तीन वर्षांच्या काळात लिहून पूर्ण झालेले ‘द ह्युमन कनेक्ट’ हे पुस्तक म्हणजे लेखकांच्या जागतिक व्यवसाय जगतातील विस्तृत व वैविध्यपूर्ण अनुभवांतून प्राप्त झालेल्या प्रभावी नेटवर्किंगच्या गुपितांचा खजिना आहे.
मनोज जगातील अनेक कंपन्यांना विलीनीकरण व अधिग्रहण यांसंदर्भात सल्ला देतात. ते म्हणतात, “पुस्तक वाचण्यास फारसे कष्टप्रद नाही आणि अल्प साधनांमध्ये खूप काही प्राप्त करण्याच्या वर्तमान जगतात ते खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकात अनुकरण करण्यासाठी सुलभ, सुसंबद्ध, व्यवहार्य सूचना आणि किस्से आहेत. या सूचना व किस्से वाचकाच्या आयुष्याशी जोडलेले असतील. यामध्ये जे मार्गदर्शन आहे, ते मार्गदर्शन मला माझ्या सुरुवातीच्या काळात मिळाले असते तर फार बरे झाले असते असे मला वाटते. अधिक सखोल व्यक्तिगत व व्यावसायिक नातेसंबंध विकसित करण्यासाठी; यशस्वी, प्रेरित, समृद्ध आयुष्याचा आराखडा तयार करण्यासाठी तसेच व्यवसाय जोमाने वाढण्यासाठी, हे पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल, अशी आशा मला वाटते.”
प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिरानी म्हणतात, “मनोजने खऱ्या अर्थाने शीर्षकाला जागणारे पुस्तक लिहिले आहे असे मला वाटते. कारण, तो त्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी विनासायास पक्के संबंध निर्माण करतो. अत्यंत विश्वासू, भल्या माणसाची ऊर्जा त्याच्या व्यक्तिमत्वातून परावर्तित होते. मानवी संबंधांवर पुस्तक लिहिण्यासाठी माझ्या मते तो उत्तम व्यक्ती आहे आणि आपल्या सर्वांनाच या जगात आनंद शोधण्यासाठी संबंध जोडावे लागतात.”
मनोज आसियान हेल्थकेअर टेक्नोलॉजीजचे सहसंस्थापक आणि इंडियन रिलीफ फाउंडेशन या सीमांत समुदायांना आरोग्यसेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. ते म्हणतात, “हे पुस्तक म्हणजे भारतातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा माझा मार्ग आहे. देशातील तरुणाई तंत्रज्ञान व सोशल मीडिया यांत पूर्णपणे बुडालेली आहे. आजूबाजूच्या जगाशी नैसर्गिक संपर्क या पिढीने गमावला आहे. स्पर्धेहून अधिक सौंदर्य समन्वयात आहे याची आठवण मला त्यांना करून द्यायची होती. व्यवहारात्मक नेटवर्किंगसारख्या पाश्चिमात्य संकल्पनेतून आलेला दृष्टिकोन बदलण्याची माझी इच्छा होती. या पुस्तकामध्ये ‘देण्याच्या’ कल्पनेचा विस्तार करण्यात आला आहे. देणे हे प्राप्त करण्याचेच वेगळे स्वरूप आहे. मनात स्वार्थ ठेवून कोणासाठी तरी काहीतरी करण्यापेक्षा देणे खूपच समाधानकारक ठरू शकते.”