तापसी पन्नू ही सर्वात दमदार अभिनेत्रींपैकी एक असून योग्य निवडीच्या जोरावर तिने भारतीय सिनेमा क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या सिनेमांमधले भावनांचे चित्रण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे असते. तापसीने दाक्षिणात्य सिनेमांमधून आपल्या करियरची सुरुवात केली आणि नुकतीच तिनं या क्षेत्रात 12 वर्ष पूर्ण केली. नाम शबानामधून केवळ सात मिनिटांत स्वतःची छाप पाडणाऱ्या तापसीनं नंतर मागे वळून पाहिलंच नाही आणि ती चाहत्यांना एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देत राहिली.
रश्मी रॉकेटमध्ये एखाद्या खेळाडूप्रमाणे कमावलेल्या शरीरापासून तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाब्बास मिथू सिनेमात क्रिकेटचे तंत्र नेमकेपणाने सादर करण्यापर्यंत तिनं कायमच आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. पॅन भारताची स्टार म्हणून ओळखली जाणारी तापसी आपल्या व्यक्तिरेखेला अक्षरशः जिवंत करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
थप्पड, सांड की आंख या सिनेमातल्या अभिनयाला तिला विविध पुरस्कार मिळवून दिलेच, शिवाय मनमर्जियांमधल्या रूमीनं तिला प्रेक्षकांचं प्रेमही मिळवून दिलं. आपल्या कसदार अभिनयानं तिनं जगभरातील लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तापसीकडे सध्या दर्जेदार सिनेमे असून त्यात अनुराग कश्यप यांचा दोबारा, वो लडकी है कहां, मेगास्टार शाहरूख खानसोबत राजकुमार हिरानी यांचा दुनकी आणि इतर अद्याप जाहीर न झालेल्या सिनेमांचा समावेश आहे.
तापसीच्या गर्ल नेक्स्ट डोअर व्यक्तिमत्त्वानं आणि सहज सोप्या फॅशन सेन्समुळे ती चाहत्यांना आपलीशी वाटते. ती सामान्यांची भाषा बोलते तसंच शहरी व निमशहरी, ग्रामीण प्रेक्षकांशीही कनेक्ट होते.
एक यशस्वी अभिनेत्री असूनही तापसीनं वेगवेगळी उद्दिष्टं आखली आहेत. तापसीनं नुकतंच ‘आउटसायडर्स फिल्म्स’ ही निर्मिती संस्था लाँच करून ब्लर आणि धक धक या आगामी सिनेमांची निर्मिती केली आहे. ती आजची सर्वात आवडती अभिनेत्री असून ब्रँड्समध्येही लोकप्रिय आहे. तिच्याकडे आज वेगवेगळ्या प्रकारचे 12 ब्रँड्स आहेत.
दिल्लीतून आलेली, कोणताही गॉडफादर नसलेली ही मुलगी आज सिनेमा क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभी आहे आणि सर्वांची मनं जिंकत आहे.