पाण्याखालचं विश्व दाखवणारा ‘गडद अंधार’ हा मराठीतील पहिला सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. ‘गडद अंधार’बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना ३ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. या चित्रपटातील ‘दरिया…’ हे गाणं नुकतंच संगीतप्रेमींच्या भेटीला आलं असून, या गाण्याला रसिकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. ‘गडद अंधार’च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.
इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये या चित्रपटाचा संगीत व ट्रेलर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या चित्रपट चित्रपटामध्ये अभिषेक खणकरनं लिहिलेलं आणि गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च्या आवाजात संगीतबद्ध केलेलं ‘दरिया, दरिया…’ या गाण्यासोबतच एक अंगाई गीत आणि एक थीम साँगही आहे. झी म्युझिक मराठीवर रिलीज होणारी हि गाणी दिव्या कुमारसह जुईली जोगळेकर राऊतनं गायली आहेत. प्रत्येक गाण्याचं पटकथेत आपलं एक महत्त्व असून, हि गाणी पटकथा गतीमान करण्याचं काम करणारी आहेत. त्या जोडीला ‘गडद अंधार’चा ट्रेलरही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण पाण्याखाली करण्यात आलं आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेलं विश्वही यात पहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. गाण्यांच्या जोडीला यातील अर्थपूर्ण संवाद मनाला भिडतात. ट्रेलरमधील प्रसंग ‘गडद अंधार’बाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत. दरिया… या गाण्याची पार्श्वभूमी असलेल्या ट्रेलरमध्ये पाण्याखालच्या गडद अंधारात कोणतं रहस्य दडलं आहे याची झलक दिसते. ‘या खोल समुद्रात किती आणि कोणत्या प्रकारची रहस्यं दडलीत हे सांगणं तेवढंच कठीण आहे’, हा ट्रेलरमधील संवाद चित्रपटातील रहस्य आणखी गडद करणारा आहे. याबाबत दिग्दर्शक प्रज्ञेश कदम म्हणाले की, पाण्याखालचं विश्व दाखवणं हे कथानकाची गरज असल्यानं अंडरवॅाटर शूट करण्यात आलं आहे. जगापेक्षा काही तरी वेगळं करण्याच्या हेतूने नव्हे तर मराठी रसिकांसमोर खऱ्या अर्थानं अनोखं असं कथानक सादर करण्याच्या उद्देशाने ‘गडद अंधार’ बनवण्यात आला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट खूप लोकप्रिय असून, त्यांचा ट्रेलरमधील प्रेझेंन्स रसिकांना आकर्षित करणारा आहे.
‘गडद अंधार’चं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं आहे. ‘बिग बॅास’ आणि ‘एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’ या रिअॅलिटी शोज्च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला जय दुधाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री नेहा महाजन त्याच्या साथीला आहे. याशिवाय शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारांनीही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, गाण्याचे संयोजन आदिनाथ पातकर यांनी केले आहे. सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.