मुंबई : हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईच्यावतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन २३ जानेवारीला दादर पश्चिम येथील कार्यालय परिसरात करण्यात आले होते. ३०० हून अधिक बँक कर्मचारी आणि अन्य व्यक्तींनी रक्तदान केले. यावेळी पत्रकार परिषदेचे औचित्य साधून बोलतानामाजी खासदार आनंदराव अडसुळ म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सामाजिक बांधिलकीच्या वसा बाळासाहेबांनी आम्हाला दिला. त्याच प्रेरणेतून आम्ही आजही कार्य करत आहोत. परंतु, बाळासाहेब यांच्यानंतर, संघटनेत कार्य करणाऱ्या माझ्या सारख्या नेते मंडळींना पक्ष नेतृत्वाकडून पुरेसा वेळ दिला जात नव्हता. तर पक्षातील सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा कोण जाणून घ्येणार असा सवाल त्यांनी केला.
माझ्या विरोधात आरोपांची राळ उठविणाऱ्या तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमरावतीमधील भ्रष्टाचारी प्रकरणे समोर होती. मुख्यमंत्री असताना उदधव ठाकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधन खाते किंवा ईडी मार्फत चौकशी लावण्यासाठी मला पाठबळ दयावे अशी विनंती केली होती. परंतु, आमच्या वाईट काळात पक्ष प्रमुखांनी म्हणावीशी साथ दिली नाही, याचे दुख मनामध्ये होते. तसेच मागच्या अडीच वर्षांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. परंतु, त्यांनी सर्व कारभार घरातून केला. महत्त्वाच्या पदावर असताना, बलाढ्य शिवसेनेसारखा पक्ष बरोबर असताना, तमाम महाराष्ट्राच्या आणि शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये ते कमी पडले असे अडसुळ म्हणाले.
शिवसेना प्रमुखांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर मी कधीही सरकार स्थापन करणार नाही, वेळ आली तर शिवसेना बंद करेन, अशा प्रकारची तत्व प्रणाली सांभाळली. तिला छेद देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेला उठाव महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेबांच्या विचारसरणीला धरून झालेल्या क्रांतीतून सहा महिन्यात भाजपा सोबत सत्तेवर आल्यानंतर विकासाची कामे जोमाने सुरू आहे. हाच विकासाचा हेतू बाळासाहेबांना अभिप्रेत होता, असे आनंदराव अडसुळ पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती जर पाहिली, तर हिंदीमध्ये एक सिनेमा प्रसिद्ध झाला होता, त्यातील ‘‘नायक’’सारखी आहे. तो एक दिवसापुरता मुख्यमंत्री होता. परंतु आज सहा महिने एकनाथ शिंदे हे त्याच पद्धतीने काम करताना आपण पाहतोय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न, उद्योगपतींचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगारीला आळा घालण्यासाठी दावोस या ठिकाणी जाऊन १ लाख ५२ हजार कोटींचे विविध उद्योग महाराष्ट्रात आणण्याचा करार झाला. यामुळे किमान ५० हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये एक प्रगती झालेली आपल्याला दिसेल. अशा प्रकारे सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास करणे, हे ध्येय घेऊन जो मुख्यमंत्री कार्यरत आहे, त्याला आपणही साथ दिली पाहिजे. त्या एका भावनेतून आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या वागण्याच्या अनुभवावरून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला असे शेवटी त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, युनियनचे उपाध्यक्ष हाशम धामस्कर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे अमोल प्रभू तसेच संयुक्तचिटणीस भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे व युनियनचे सह खजिनदार जनार्दन मोरे उपस्थित होते.