रत्नागिरी : २०१३ साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते आणि माजी आमदार संजय कदम रविवारी, २२ जानेवारीला शिवसेनेत घरवापसी करत आहेत. ठाकरे गटाने कदम पिता पुत्रांची कोंडी करण्यासाठी ही व्यूहरचना आखल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारेच्या उपस्थितीत संजय कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवरून रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे नेते, आमदार योगेश कदम माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंवर बसरले आहेत. ‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही. संजय कदमांनी ठाकरे गटात जाणे ही त्यांची राजकीय आत्महत्या असेल’, असे योगेश कदम म्हणाले.
रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर शनिवारी माध्यमांसोबत बोलताना योगशे कदम म्हणाले की, ‘ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक किंवा नवीन नाही. २०१९पासून अनिल परब माजी आमदार सुनील कदम यांना शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळेस मला तिकिट मिळू नये असेही प्रयत्न होत होते. निवडणूक आल्यानंतर देखील तिथे माजी आमदार संजय कदम यांना ताकद देण्याचे काम अनिल परब करत होते. राष्ट्रवादी सोडून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयामुळे मला राजकीय फायदा होणार आहे. खरंतर ही त्यांची राजकीय आत्महत्या असणार आहे. कारण उद्धव ठाकरेंनी आजवर कोणत्याही नेत्याला कधीच मोठे होऊ दिले नाही.’