मुंबई : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर ‘हॉप ऑन – हॉप ऑफ’ बसची सुविधा आज सुरू केली आहे. दुमजली बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी पर्यटनमंत्री लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाच्या चित्रफित, छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे प्रकाशन, अंजिठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॅालेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
युवा पर्यटन संघाची स्थापना
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमात पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी आज सहभागी झाले होते. पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. आगामी कालावधीत जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ हा उपक्रम राबवत आहे. वसुंधरेला हानी न पोहोचता पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.
यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट ५०० पर्यटक रिसॉर्टचे फोटो लॉन्च करण्यात आले ही छायाचित्रे उत्कृष्ट दर्जाची आहेत. पर्यटन पॅकेजेसमध्ये या छायाचित्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटनविषयक व्हिडीओ देखील यावेळी लॉन्च करण्यात आले. अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत अजिंठा केव्ह व्हयू पॉईंट या प्रकल्पाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.