मुंबई: ख्यातनाम साहित्यिक व अबकडइ दिवाळी अंकाचे संपादक स्व. चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार देण्याचा यावर्षी प्रथमच निर्णय चंद्रकांत खोत मित्र परिवाराने निश्चित केल्यावर हिंदी साहित्यिक डाॅ. रमेश यादव यांनी पुढाकार घेऊन रोख रुपये ५,५५५/-, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप ठरविले.
या पुरस्काराकरिता अनेकांना विविध क्षेत्रात नावारुपाला आणणार्या रात्रंदिन मेहनत घेणारे कोंकणचे सुपुत्र, लेखक आणि कवी श्री. प्रकाश गणपत जाधव यांचे नांव जाहीर करण्यात आले. ते एकता कल्चरल अकादमीच्या माध्यमातून गेली 34 वर्षे कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. असंख्य कवी, लेखक, नृत्य व गायक कलाकार त्यांनी घडविले. म्हणून यावर्षीचा पहिला चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार प्रकाश गणपत जाधव यांना नाट्य-सिने अभिनेते नागेश मोरवेकर, हिंदी साहित्यिक व चंद्रकांत खोत मित्र परिवाराचे डाॅ. रमेश यादव, अबकडइ दिवाळी अंकाचे जाहिरात व्यवस्थापक म्हणून धुरा संभाळलेले गजानन रेवडेकर यांच्या शुभहस्ते मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे नाट्य-सिने अभिनेते प्रमोद पवार, कोंकण कवी अजय कांडर, रंग माझा वेगळा या मालिकेची अभिनेत्री अनघा भगरे, भगवान दास, किशोर पवार सदानंद राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी श्री. जाधव यांनी एकता कल्चरल अकादमीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अवधूत भिसे यांनी केले.