मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक एकेरी कॅरम स्पर्धेत पुरुष गटामध्ये सोहेल मुकादमने व महिला गटात संध्या बापेरकरने तर बुद्दीबळ स्पर्धेत सचिन काटकरने विजेतेपद पटकाविले. कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँकेच्या सोहेल मुकादमने सिटी को-ऑप. बँकेच्या शिशिर खडपेचे आव्हान १८-२, १९-१० असे सहज संपुष्टात आणून विजेतेपदाला गवसणी घातली. जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटाचा म्युनिसिपल को-ऑप. बँकेची संध्या बापेरकर विरुध्द उषा कांबळे यामधील अंतिम सामना चुरशीचा झाला. पहिला सेट ९-८ असा चुरशीचा जिंकणाऱ्या संध्या बापेरकरला उषा कांबळेने दुसरा सेट १५-० असा सहज जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. परंतु निर्णायक सेटमध्ये अचूक फटक्यांची आतषबाजी करीत संध्या बापेरकरने १९-११ असा विजय मिळवीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. दुहेरी गटाचे विजेतेपद पटकाविताना महिलांमध्ये म्युनिसिपल को-ओप. बँकेच्या मानसी पाटील-संगीता बेंबडे जोडीने त्यांच्याच बँकेच्या संध्या बापेरकर-शर्वरी सावंत जोडीचा १७-१, १०-४ असा तर पुरुषांमध्ये कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँकेच्या सोहेल मुकादम-वसिम खान जोडीने जनकल्याण सहकारी बँकेच्या भार्गव धारगळकर-दीपक गायकवाड जोडीचा २५-०, १८-० असा पराभव करून अंतिम फेरी जिंकली.
बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अंतिम डावाच्या मध्यापर्यंत तोडीस तोड चाली रचणाऱ्या वैभव सागावकरच्या राजाला अखेरच्या क्षणी वजिराच्या सहाय्याने जेरीस आणून मुंबै बँकेच्या सचिन काटकरने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. परिणामी मुंबै बँकेच्या वैभव सागावकरला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. म्युनिसिपल को-ओप. बँकेच्या दीप शिलीमकरने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, प्रकाश वाघमारे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, अशोक नवले, मनोहर दरेकर, अमोल प्रभू, नितीन गवादे, समीर तुळसकर, हाशम धामसकरसह इतर पदाधिकारी कार्यरत होते.