पुणे :पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात जम्मू काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. तिथल्या सुंदर निसर्गात राहणाऱ्या माणसांना गेले अनेक वर्ष संघर्षमय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तेथे राहणाऱ्या महिलांना तर जास्त यातना सहन कराव्या लागतात. पुण्याच्या असीम फाउंडेशनने भारतीय सैन्याच्या साथीने अशा महिलांना रोजगार देण्यासाठी तेथे म्हणजे अगदी सीमारेषेनजीक बेकरी व्यवसाय सुरू करून दिले आहेत. बेकरीच्या कामातून रोजगार मिळवणाऱ्या या जम्मू-काश्मीरमधील भगिनींना जम्मू-काश्मीर बाहेरचा आपला भारत देश कळावा, बेकरी. व्यवसायातील अधिक कौशल्य आत्मसात करता यावे यासाठी असीम फाउंडेशनने जम्मू-काश्मीरमधील भगिनींचा पुणे दौरा आयोजित केला आहे.
असा असणार पुणे दौरा
पुणे बघायला आणि इथल्या माणसांना भेटायला जम्मू-काश्मीरमधील या भगिनी सोमवार १६ जानेवारी २०२३ रोजी येथे येत आहेत. पुण्यातील हमाल बांधव त्यांना पुष्प देऊन व रिक्षाचालक महिला भगिनी त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या रिक्षातून सोडून स्वागत करणार आहेत. रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी या स्वागताचे नियोजन केले आहे. मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर महिलांशी संवाद साधतील. या दौऱ्याच्या दरम्यान गोखले इन्स्टिट्यूट येथे व्यवसाय वाढीचे प्रशिक्षण, रत्नाकर जपे, सुमेधा जळगावकर, कौस्तुभ जोशी अशा दिग्गजांकडून प्रगत प्रशिक्षण, चितळे बंधु – रिबन्स एन्ड बलुन्स सारख्या संस्थांना भेटी आणि पुणे दर्शन असा भरगच्च कार्यक्रम संस्थेने ठरवला आहे. २१ जानेवारीला गोवर्धन मंगल कार्यालयामध्ये आयोजित स्नेह मेळाव्यात पुणेकर या भगिणींशी संवाद साधू शकणार आहेत, असे असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी यांनी सांगितले.