मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुध्दिबळ स्पर्धेत वैभव सागावकर, सचिन काटकर तर कॅरम स्पर्धेत वासिम खान, प्रियेश पाठक यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुध्दिबळाच्या उपांत्यपूर्व फेरीत वैभव सागावकरने विजयी डावपेच रचत विनोद मोरेचे आव्हान संपुष्टात आणले. सचिन काटकरने अनुज रमाणीचा, राजीव कांबळेने आनंद साळकरचा तर दीप शिलिंगकरने निहार थवईचा पराभव करून बुध्दिबळाची उपांत्यपूर्व फेरी जिंकली. बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, जनकल्याण सहकारी बँकेचे संचालक शरद कांबळे, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, अमोल प्रभूसह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कॅरमच्या पुरुष एकेरी गटात अपना सहकारी बँकेच्या प्रियेश पाठक व कोंकण मर्कन्टाईल बँकेच्या वासिम खानला उपांत्यपूर्व फेरी जिंकण्यासाठी तिसऱ्या सेटपर्यंत झुंजावे लागले. प्रियेश पाठकने अतुल काकीरडेला १२-१३, १२-१०, २१-६ असे तर वासिम खानने दीपक कारंडेला १०-२३, १३-१२, ८-५ असे हरविले. पुरुष दुहेरी गटात शिशिर खडपे-विनोद चव्हाण जोडीने रवी गायकवाड-मिलिंद लाड जोडीचा १२-६, ६-४ असा, दीपक गायकवाड-भार्गव धारगळकर जोडीने आर. फडके-विनायक आंग्रे जोडीचा १८-६, ११-१४, ९-७ असा, कल्याणजी परमार-राजीव कांबळे जोडीने प्रकाश फणसे- प्रथमेश पवार जोडीचा १२-०, ७-१२, १७-१ असा तर वासिम खान-सोहेल मुकादम जोडीने संतोष मोरे-प्रियेश पाठक जोडीचा १८-१, १०-६ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. महिला दुहेरी गटात मानसी पाटील-संगीता बेंबडे जोडीने वृषाली राऊल-सोनाली सावंत जोडीवर १२-०, १५-० असा तर संध्या बापेरकर-शर्वरी सावंत जोडीने अपूर्वा कालडोके-कोमल शिवूडकर जोडीवर २५-०, १३-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.