मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक एकेरी कॅरम स्पर्धेत पुरुष गटात वैभव भट, इंद्रनील देसाई, दीपक कारंडे, भार्गव धारगळकर यांनी तर महिला गटात संध्या बापेरकर, वृषाली राऊत, दीपा फडके, संगीता बेंबडे आदींनी सलामीचे सामने जिंकले. दुसऱ्या सेटमधील चौथ्या बोर्डमध्ये जनकल्याण सहकारी बँकेचा कॅरमपटू वैभव भटने ब्रेक टू फिनिशच्या आविष्कारासह अक्षय टाकवेकर विरुध्द १७-०, २५-६ असा सहज विजय नोंदविला.
पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर राहून देखील मालाड सहकारी बँकेच्या इंद्रनील देसाईने मुंबै बँकेच्या अतुल ठोकेचे आव्हान ५-८, १३-१२, १५-० असे संपुष्टात आणले. अटीतटीच्या सामन्यात दीपक कारंडेने सचिन मिश्राला ९-३, ६-१०, १४-० असे चकविले. शैलेश करपेने प्रदीप चव्हाणचा १७-२, १६-० असे तर भार्गव धारगळकरने सुशांत बोराडेचा २५-०, २५-० असा पराभव केला. महिला गटाची दुसरी फेरी गाठण्यासाठी प्रथम मानांकित म्युनिसिपल को-ऑप. बँकेच्या संध्या बापेरकरला कनीज फातमा काझीने तिसऱ्या सेटपर्यंत ५-११, १२-९, ९-८ असे झुंजविले. वृषाली राऊतने सर्वरी सावंतवर १८-०, ७-४ असा, दीपा फडकेने कोमल शिंदकरवर ९-१, १३-० असा तर संगीता बेंबडेने अपूर्व कालडोकेवर २१-०, २४-० असा विजय मिळवून पहिली फेरी जिंकली. स्पर्धेचे उदघाटन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, जनकल्याण सहकारी बँकेचे संचालक शरद कांबळे, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू नीलिमा घोडके, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, अमोल प्रभूसह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
…