टाटा मुंबई मॅरेथॉन: पाचव्या जेतपदासाठी सुधा उत्सुक
मुंबई, 14 जानेवारी 2023: टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 18व्या आवृत्तीचे औचित्य साधून भारताचा अव्वल धावपटू, गतविजेता श्रीनू बुगथा याने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या पात्रतेचे लक्ष्य ठेवले आहे. आशियाई स्पर्धेसाठीची पात्रता वेळ 2 तास, 15 मिनिटे इतकी आहे. महिला गटात गतविजेती सुधा सिंग ही पाचव्या जेतेपदासाठी उत्सुक आहे.
भारतीय आर्मीचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीनू याने 2021मध्ये कट ऑफ पेक्षा कमी वेळ नोंदवली आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल लेबल रोड असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी त्याची पुनरावृत्ती करताना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील हँगझो शहरात रंगणार्या एशियाड स्पर्धेसाठी दावेदारी पेश करण्यास आतुर आहे.
मला 2020 स्पर्धेच्या तुलनेत अधिक चांगली वेळ नोंदवायची आहे, असे बुगथा याने शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.तीन वर्षांपूर्वी त्याने 2:18:44 सेकंद अशी वेळ नोंदवली. मात्र, त्याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 2:14:59 सेकंद अशी आहे.
बुगथा याच्यासमोर भारताच्या अॅथलीट्समध्ये ऑलिम्पियन आणि माजी आशियाई मॅरेथॉन विजेता गोपी टी. याचे आव्हान असेल. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होत आहे.
एक धावपटू म्हणून माझ्या पुनरागमनाचे श्रेय मला टाटा मुंबई मॅरेथॉनला द्यावे लागेल, असे गोपी म्हणाला. गोपी याने 2016 मध्ये मोठ्या रेसमध्ये पेसर म्हणून सुरुवात करताना 2018मध्ये मुंबई मॅरेथॉन जिंकली.
भारताची अव्वल रनर आणि गतविजेती सुधा सिंग हिने 2016, 2018, 2019 आणि 2020 अशी चार वेळा मुंबई मॅरेथॉन जिंकली आहे. त्यात तीन सलग जेतेपदे आहेत. आता सलग चौथ्या आणि एकूण पाचव्या जेतेपदासाठी तिने कंबर कसली आहे. मॅरेथॉनमध्ये खूप स्पर्धा असते. स्पर्धेचा मार्ग खडतर असतो. त्यातच 35 किमी अंतर पार केल्यानंतरचा प्रवास अधिक आव्हानात्मक असतो. मात्र, ही आव्हाने पेलून जिंकण्याचा आनंद अवर्णनीय असतो, असे ऑलिम्पियन सुधा हिने सांगितले.
महिला गटात सुधा हिच्यासह 2017 आणि 2019मध्ये तिसरा क्रमांक आणि 2020मध्ये पाचवा क्रमांक मिळवणारी जिग्मेड डोल्मा हिच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. माझे लक्ष वैयक्तिक सर्वोत्तम वेळ सेट करण्यावर आहे, असे लडाखमधील या रनरने म्हटले.
टाटा मुंबई मॅरेथॉन या आशियातील सर्वात मोठ्या रोड रेसमध्ये 55 हजारहून अधिक धावपटू सहा गटांमध्ये धावतील. त्यात एलिट गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 4 लाख आणि 3 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
हाफ मॅरेथॉन प्रकारात 2016 मधील विजेते दीपक कुंभार आणि गतविजेती पारुल चौधरी यांच्यावर भारताची भिस्त आहे.
एलिट गट भारताचे पुरुष धावपटू:
श्रीनु बुगाथा
गोपी टी
अनिश थापा
कालिदास हिरवे
मान सिंग
राहुलकुमार पाल
मानवेंद्र सिंग
गुरुजीत सिंग
पंकज ढाका
रवी प्रकाश
सर्वेश कुमार
योगेंद्र कुमार
हेत राम
नीरज कुमार
प्रथमेश पाटील
चंदिराम लाटे
योगेश कुमार
बसंत चौहान
महिला धावपटू:
सुधा सिंग
त्सेतन डोळकर
जिग्मेट डोल्मा
दिव्यांका चौधरी
प्रीती चौधरी
राणी मुचंडी
रेणू सिंग
आरती पाटील
श्यामली सिंग
चवी यादव
निर्माबेन ठाकोर